Offensive posts about Amruta Fadnavis on Social Media : आधीच गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या व्यक्तीला अमृता फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले असल्याची चर्चा आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून एका वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. खेमदेव गरपल्लीवार असं तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची यापूर्वीची नोंद आहे. अश्लील शिवीगाळ करून लोकांना धमकावणे, जमिनी बळकावणे, लोकांची फसवणूक करणे, विनयभंग असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र इतक्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असतांना देखील पोलिसांच्या प्रेसनोट मध्ये समाजमाध्यमातील पोस्ट संदर्भातील गुन्ह्यालाच का महत्त्व देण्यात आलं याची चर्चा रंगली आहे.


बोलण्यास पोलिसांचे मौन...


विशेष म्हणजे खेमदेव गरपल्लीवार याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यापैकी अनेक गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. तरी पोलिसांच्या प्रेसनोट मध्ये समाजमाध्यमातील पोस्ट संदर्भातील गुन्ह्यालाच महत्त्व देण्यात आलं आहे. यासंदर्भात पोलीस विभाग काहीही बोलायला तयार नाही. 


लोकांमध्ये दहशत माजविण्याची सवय


खेमदेव गरपल्लीवार गोंडपिपरी परिसरात दादागिरी करून लोकांमध्ये दहशत माजवण्याचा काम करत असल्याचा आरोप होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्याच प्रस्तावावर योग्य निर्णय घेऊन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी खेमदेव गरपल्लीवार याला एक वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. 


अपक्ष नगरसेविकेचे पती...


खेमदेव गरपल्लीवार हे गोंडपिंपरी नगरपंचायतीचेच्या अपक्ष नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांचे पती आहेत. त्याचा स्वतःचा भाजपशी कुठलाही संबंध नसल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. जुलै 2022 मध्ये अमृता फडणवीस यांनी वेश्याव्यवसाया बाबत केलेल्या वक्तव्यावर गरपल्लीवार यांनी व्हाट्सएपवर आक्षेपार्ह पोस्ट  केली होती. त्या पोस्टमुळे जाती जातीत तेढ निर्माण होईल आणि स्त्रियांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल या अनुषंगाने पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल असतानाही सोशल मीडियावरील पोस्ट संदर्भात ही कारवाई करण्यात आली असल्याचे स्थानिक पोलिसांकडून दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे विशेष.


यापूर्वीही अनेक वाद ...


राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अनेकवेळा अमृता फडणवीस यांनी विविध सामाजिक प्रश्न, राजकीय परिस्थीतीवर भाष्य केले होते. त्यांच्या या भाष्यामुळे अनेकवेळा त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. याशिवाय त्यांच्या अनेक राजकीय पोस्टमुळेही त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात आली होती.


ही बातमी देखील वाचा...


Shyam Manav : अनिसच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरणाचे प्रयत्न ; धमकीसत्र सुरुच