चंद्रपूर :  ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने त्यांच्या टायगर सफारीसाठीच्या बुकिंग वेबसाईट मध्ये बदल केला आहे. बुकिंग साठी सध्या असलेली mytadoba.org ही साईट  बंद करण्यात आली असून mytadoba.mahaforest.gov.in  या साईटवरून आता बुकिंग करता येणार आहे. 17 ऑगस्टपासून या नवीन साईट वर बुकिंग सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी या नवीन  वेबसाईटचाच बुकिंगसाठी उपयोग करावा असं आवाहन ताडोबा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. 


ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 338  जिप्सी असून जिप्सी चालकांची थकीत रक्कम अंदाजे 3 ते 4 कोटींच्या घरात आहे. Mytadoba.org ही ताडोबाची बुकिंग वेबसाईट गेल्या तीन वर्षांपासून एका खाजगी व्यक्तीला हाताळण्यासाठी देण्यात आली होती आणि या व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट 1 जून पासून समाप्त झाले आहे. मात्र याच व्यक्तीने बुकिंग मार्फत जमा झालेले पैसे ताडोबा प्रशासनाला दिले नसल्याने हे पेमेंट लेट होत असल्याचा जिप्सी चालकांचा आरोप आहे. तर दुसरीकडे ताडोबा प्रशासन पैसे जमा न झाल्याचं मान्य करतंय.  चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालकांचे 1 जून पासूनचे पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.


चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. व्याघ्र प्रेमींची पर्यटनासाठीची पहिली पसंती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा असते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात वाघ आणि  बिबटे आहेत.  वाघांशिवाय ताडोबा जंगलात कोर झोनमध्ये  वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.  दुर्मिळ श्रेणीतील खवल्या मांजर, चांदी अस्वल आणि उडणारी खार यांची नोंद करण्यात आली. तसेच भेडकी, चौसिंगा, निलगाय, लंगूर, अस्वल, शेपट्टीवर पट्टा असलेली मांजर, उदमांजर, सायळ, मुंगुस, मोर, ससा आदी वन्यजीवांची नोंद वन्यजीव प्रेमींनी केली. 


ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी शुल्कात  वाढ 


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. बफर झोन मधील सफारी साठी नवीन वाढीव दर 1 जुलैपासून लागू  करण्यात आले आहेत. तर कोर झोन मधील सफारीसाठी देखील दर वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. जुन्या दरा मध्ये सफारीसाठी चार हजार रुपये आकारले जायचे. मात्र आता 1 जुलैपासून 5300  रुपये आकारले जातील. तर शनिवार-रविवार आणि सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी हाच दर 7300  राहणार आहे. 2016 पासून ताडोबाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली नसल्याने ही दरवाढ कऱण्यात आल्याचं ताडोबा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र यामुळे सामान्य नागरिकांसाठी ताडोबा ची सफारी चांगलीच महागणार आहे.