Chandrapur Rains : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) मुसळधार पावसाच्या दरम्यान वीज पडून पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे शेतात रोवणीचे काम करणाऱ्या कल्पना झोडे आणि अंजना पूसतोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके या 25 वर्षीय शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला तर गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय पोंभूरणा तालुक्यात देखील अर्चना मडावी या 28 वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. वीज कोसळून लोकांचा बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याला आज रेड अलर्ट


दरम्यान हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूर वेधशाळेने हा अलर्ट दिला आहे.


चंद्रपूरमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर 


चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज म्हणजे 27 जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 


जिवती तालुक्यात झानेरी गावाजवळ यंत्रसामुग्री वाहून गेली


चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात काल (26 जुलै) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे यंत्रसामुग्री वाहून गेली आहे. झानेरी या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरु असताना अचानक झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी उभे असलेले तीन ट्रॅक्टर आणि दोन आयजॅक मशीन, लोखंडी रॉड, सिमेंट आणि इतर साहित्य वाहून गेले. यामुळे संबंधित ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि यामुळे डोंगराळ भाग असलेल्या जीवती तालुक्यात अनेक ओढ्यांना विक्राळ रुप आलं आहे.


हेही वाचा


Vidarbha Rains : विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका, चंद्रपूरमध्ये गावांना पुराचा विळखा, तर वाशिममध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान