चंद्रपूर : कचरा ही जगभरातील एक फार मोठी समस्या आहे. ही गंभीर समस्या केवळ माणसांसाठीच नाही, तर वन्यप्राण्यांसाठी देखील जीवघेणी ठरत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Andhari Tiger Reserve) उघडकीस आला आहे. भानुसखिंडीच्या तीन बछड्यापैकी एक असलेल्या नयनतारा नावाच्या एका बछड्याने चक्क पाण्याची प्लास्टिक बाटली (Plastic Bottle) तोंडात घेऊन पळ काढला आहे. हा  प्रकार 30 डिसेंबर 2023 रोजी जांभूळडोह येथे घडला. हे दृश्य मुंबईचे छायाचित्रकार विवान कारापूरकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. मुळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक बंदी असताना सुद्धा ही प्लॅस्टिकची बाटली जंगलात आलीच कशी, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.


प्लास्टिक बंदी असताना जंगलात प्लॅस्टिकची बाटली ?


जगभरातील व्याघ्रप्रेमींना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कायम आकर्षिक करत राहिला आहे. शिवाय अलीकडच्या काळात ताडोबात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटकांचा कायम ओघ असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कधी प्लास्टिक बाटल्या, तर कधी प्लास्टिकची वेष्टने आढळतच आहेत. असाच एक प्रकार नव्याने उघडकीस आल्याने व्याघ्रप्रेमी आणि पयर्यावरणप्रेमींची काळजी वाढली आहे. ताडोबातील अलिझंजा आणि रामदेगी बफर झोन परिसरात गेल्या काही महिन्यांपासुन भानुसखिंडी आणि बबली वाघिणीचा संचार आहे. भानुसखिंडीला तीन बछडे असून यांचा कायम सोबत वावर असतो, यांच्यातील एक असलेल्या नयनतारा नावाच्या एका बछड्याने पाण्याची प्लास्टिक बाटली तोंडात घेऊन पळ काढल्याचा प्रकार 30 डिसेंबर 2023 ला जांभूळडोह येथे घडला. हे दृश्य मुंबईचे छायाचित्रकार विवान कारापूरकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, त्यानंतर एकच खळबळ उडाली. ताडोबात प्लास्टिक बंदी असताना जंगलात ही प्लॅस्टिकची बाटली कशी आली, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.


यापूर्वी देखील घडला होता असाच प्रकार 


मे 2023 मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात ‘बबली’ या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. तर असाच एक प्रकार निमढेला बफर क्षेत्रात घडला होता, ज्यामध्ये भानुसखिंडी या वाघिणीचे 15 महिन्यांचे तीन बछडे एका रबरी बुटांशी खेळताना एका वन्यजीवप्रेमींना दिसून आले. ही छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दोन वर्षांआधी ताडोबात रस्त्याचे काम सुरू असताना एका वाघाने मजुराच्या प्लास्टिकचे घमेले तोंडात घेऊन धूम ठोकल्याचा प्रकार घडला. एकदा तर वाघ मजुरांच्या जेवणाचा डबाच घेऊन गेल्याचा प्रकारही घडला होता. असे अनेक प्रकार ताडोबात घडत असतात. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘प्लास्टिकमुक्त ताडोबा’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. मात्र घडणाऱ्या या घटनांकडे गांभीर्याने बघणे गरजेचं आहे. चुकून प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेकदा प्राण्यांचा मृत्यू होतो, त्यामुळे नियमांची अंमलबजावणीसुद्धा गांभीर्याने करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून जोर धरू लागली आहे. 


हेही वाचा :