Chandrapur News चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यातील वन विकास महामंडळाच्या (Forest Development Corporation of Maharashtra) अधिकार्‍यांचा अजब प्रकार समोर आला आहे. यात चक्क वन विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनीच सागवानाची अवैध कटाई आणि विक्री केल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या  प्रकरणी वन विकास महामंडळाचे सहा कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे चंद्रपुर (Chandrapur News) जिल्ह्यासह संपूर्ण वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.


वन विकास महामंडळाचे सहा कर्मचारी निलंबित 


वन विकास महामंडळाच्या (FDCM) मामला परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील आत्राम, वनपाल विपुल आत्राम, वनपाल उमेश डाखोरे, वनपाल नेताजी बोराडे, वनरक्षक प्राची चुनारकर आणि वनमजूर किशोर गेडाम अशी निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात मिळालेली माहिती अशी की,  मामला वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवानाची अवैध कटाई करून त्याची अवैधपणे विक्री केली जात असल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती,  तसेच या प्रकरणी निनावी येथे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.


या बाबत मामला डेपोत मौका चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणातील सत्यता समोर आली. परिणामी, प्रकरणाचे  गांभीर्य लक्षात घेता आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर संबंधित सहा दोषी अधिकार्‍यांवर  ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.  मात्र, या कारवाईमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.


धक्कादायक! एकाच घरात आढळले अनेक वन्य प्राण्याचे अवयव


दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील काटोल वनपरिक्षेत्र परिसरात वन अधिकार्‍यांच्या पथकाच्या कारवाई मोठे यश प्राप्त झाले आहे. यात एकाच घरातून अनेक वन्य प्राण्याचे अवयव वन अधिकार्‍यांच्या पथकाने जप्त केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात बिबट्याची कवटी, 15 नख, बिबट्याचा मिश्या, चिंकाऱ्याचे पाच शिंग इत्यादि अवयव जप्त करण्यात आले आहे. तर या प्रकरणी  एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.


श्रीकांत किसन दुपारे असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या घरातून अवयवासह शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील जप्त करण्यात  आले आहे. या कारवाई नंतर संशयित आरोपीला पुढील पाच दिवस वन कोठडीत पाठवले असून वन विभाग या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 


 
इतर महत्त्वाच्या बातम्या