नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. शिवानी वडेट्टीवार यांच्या कथित भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून माफी मागण्याची मागणी केली गेली, मात्र शिवानी वडेट्टीवार यांनी त्याचं वक्तव्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातीलच असल्याचा दावा करत माफी मागण्यास नकार दिला आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन काही सांगितलं नसलं तरी त्यांचे वडील विजय वडेट्टीवार यांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांना दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, शिवानी वडेट्टीवार याचं वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी शिवानीकडे विचारणा केली, जर त्यांच्याकडून हे वक्तव्य चुकून झालं असेल तर माफी मागण्याची सूचनाही त्यांनी आपल्या कन्येला केली. मात्र शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांच्या त्या वक्तव्यांचा संदर्भ सावरकर यांनीच स्वतः लिहिलेल्या 'सहा सोनेरी पाने' या पुस्तकात असल्याचं सांगितलं.
शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य स्वतः सावरकरांचंच असेल तर त्यांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असंही विजय वडेट्टीवार यांनी एबीपी माझाला सांगितलं.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त टीका केली होती. यामुळे राज्यात मोठा वाद पेटला होता. राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपाने काही दिवसांपूर्वीच सावरकर यात्रेचं आयोजन केले होते. या गौरव यात्रेतून सावकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे कसे राहू शकतात असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आजही त्यांच्यासाठी श्रद्धेय असल्याचा दावा करत भाजपचं त्यांच्याविषयी असलेलं प्रेम बेगडी असल्याचा आरोप केला होता. हे सर्व प्रकरण शांत झालं असं वाटत असतानाच विदर्भातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत शिवानी वडेट्टीवार काय म्हटलंय?
हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? तर सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात.
सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की
सावरकरांचे विचार होते.. काय विचार होते? सावरकर म्हणायचे की, बलात्कार हे राजकीय अस्त्र आहे. हे अस्त्र तुम्ही राजकीय विरोधकाविरुध्द वापरले पाहिजे.
मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटू शकेल. अशा लोकांचा प्रचार करत हे
लोक रॅली काढतात, अशी टीका शिवानी वडेट्टीवार यांनी त्या व्हायरल व्हिडिओमधून केलीय.
एबीपी माझाने या व्हिडिओची सत्यासत्यता तपासलेली नाही. तसंच शिवानी वडेट्टीवार यांनी दावा केल्यानुसार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहा सोनेरी पाने पुस्तकात खरोखरच त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ आहे का, याची खातरजमा केलेली नाही.
या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार?
स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या जाहीर सभेत स्पष्ट केलं होतं. यानंतरही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेत्यांकडून सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केली गेली आहेत. त्यात शिवानी वडेट्टीवार यांनी राहुल गांधींच्या पुढे जात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस मागे हटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, काँग्रेसच्या नेत्यांची मती भ्रष्ट झाली आहे. इतिहासाची माहिती नाही. खुर्चीची भूक आहे. एनएसओएच्या नागपूरच्या अधिवेशनात काय झाले? गंगा जमुना वस्तीमध्ये काय झाले? हा देश पूर्ण साक्षीदार आहे. अशा प्रसंगात ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या यातना भोगल्यात त्या संदर्भात असे भाष्य करणे, हे कॉंग्रेसला शोभणारेच आहे कारण, कॉंग्रेसने ठरवून टाकले आहे की विनाकाशकाले विपरीत बुद्धी. पण भाजपला प्रतीक्षा आहे ती सावरकरांविषयी आदर असलेल्या उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्याची.. असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
शिवानी वडेट्टीवार कोण आहेत?
शिवानी वडेट्टीवार या माजी मंत्री विजय वडेटीवार यांच्या कन्या आहेत. तर शिवानी वडेट्टीवार यांच्याकडे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव पद असून त्या सध्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. त्या चंद्रपूरच्या मतदारसंघात काँग्रेससाठी अनेकवेळा प्रचार-प्रसाराचं काम करताना दिसतात. सध्या त्या सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत.