Maharashtra Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) घराच्या अंगणात झोपलेल्या महिलेचा बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना सावली तालुक्यातील चक-विरखल येथे घडली. मंदा सिडाम (52) असं मृत महिलेचं नाव असून काल रात्री ही महिला घराच्या अंगणात मच्छरदाणी लावून झोपली होती. रात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केला. मात्र महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या प्रेताभोवती मच्छरदाणी गुंडाळली गेली आणि त्यामुळे बिबट्याला तिला ओढून नेता आलं नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 900 गावं ही जंगलव्याप्त म्हणजे जंगलालगत आहेत. त्यामुळे वर्षभर या भागात पाळीव जनावरं आणि माणसांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होत असतात. त्यामुळे हा भाग कायम वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली असतो. विशेषतः गेल्या काही वर्षात संरक्षणाचे उपाय चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्यानं जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 50 लोकांचा वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हा गेल्या 10 वर्षातला उच्चांक आहे. उन्हाळ्यात तर संघर्ष अगदी शिगेला पोहोचतो. उन्हाळ्यात पाण्यांचे स्रोत आटल्यानं जंगली जनावरं गावाकडे वळतात आणि कळत-नकळत हल्ले होतात.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांच्या घरात आहे. उन्हाळ्याच्या काळात रात्रीचे तापमान देखील अधिक असल्यानं ग्रामीण भागांत नागरिक घराच्या अंगणात झोपतात. त्यामुळे ग्रामीण भागांत वन्यजीवांच्या हल्ल्याची सतत भीती असते. चक-विरखल गावात दुर्दैवानं ही शक्यता खरी ठरली आहे. वनविभागाचं पथक या घटनेचा अधिक तपास करत आहे.
नाशकात एकाच दिवशी तीन बिबट्यांच्या मृत्यूनं हळहळ
बिबट्या आणि नाशिक शहर (Leopard) आणि जिल्हा हे जणू समीकरण बनले आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग तळ ठोकून आहे, तर दुसरीकडे बिबट्यांच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी बागलाण (Baglan) तालुक्यातील तांदुळवाडी येथे एकाच वेळी एकाच ठिकाणी मादी बिबट्या आणि तिच्या एक वर्षांच्या बछड्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तर काल एकाच दिवशी तीन घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या बिबट्याने छोट्या बछड्यावर चढवलेल्या हल्ल्यात बछडा ठार झाला. तर महामार्गावर वाहनांच्या धडकेतही एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या दोन घटना घडल्या असताना एका महिन्यांपूर्वी मरणासन्न अवस्थेत ताब्यात घेतलेल्या बिबट्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :