Chandrapur News: चंद्रपुरात एका वैद्यकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचं खळबळजनक प्रकरण पुढे आलं आहे. फिर्यादी अधिकारी हा आंबटशौकीन असल्याने त्याला 7 वर्षाआधी कार्यालयात अश्लील चित्रफिती पाहत असल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चंद्रपूर शहरातील भानापेठ येथे राहणाऱ्या या प्रकरणातील आरोपी झिबल भारसाखरे याची फिर्यादी वैद्यकीय अधिकाऱ्याशी चांगली ओळख होती. डॉक्टरसाहेब देखील चांगलेच रंगीन मिजाज असल्याने आपल्या जाळ्यात अलगद अडकतील याची त्याला खात्री होती. त्यामुळे त्याने आपल्या ओळखीच्या एका महिलेची त्यांच्याशी मैत्री घडवून आणली. विशेष म्हणजे ही महिला आणखी कोणी नसून आरोपी जिबल याची दुसरी पत्नी होती. या नंतर या अधिकाऱ्याला एका फ्लॅटवर बोलावून त्या महिलेसोबतचे व्हिडिओ चोरून चित्रित करण्यात आले.


काही दिवसांनंतर त्या महिलेने डॉक्टरला संपर्क करून 5 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी जिबलने मध्यस्थी करून डॉक्टरकडून 3 लाख वसूल केले आणि सर्व व्हिडिओ डिलिट केले आहे अशी बतावणी केली. मात्र काही दिवसांनी डॉक्टरकडून अजून पैसे उकळण्याच्या उद्देशाने जिबल आणि त्याच्या पत्नीने खंडणीचा कट रचला. या कटात सादिक खान आणि इतर दोन महिलांना सामील करण्यात आले. 


अश्लील चित्रफीत सार्वजनिक करण्याची धमकी दाखवून 50 लाखांच्या खंडणीची मागणी


सादिक खान याने पीडित अधिकाऱ्याची अश्लील चित्रफीत सार्वजनिक करण्याची धमकी दाखवून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली. मात्र पीडित डॉक्टरने पोलीस अधीक्षकांना तक्रार करत आपबीती सांगितल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने चार पथके तयार करून आरोपींवर सापळा रचला. पाच लाख रुपयांचा चेक आणि तीस हजार रुपये रोख रक्कम घेताना पोलिसांनी आरोपी सादिक खान आणि इतर आरोपींना अटक केली. या प्रकरणात दोन पुरुष आणि तीन महिला आरोपींना अटक करत पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्याची हनीट्रॅपमधून सुटका केली आहे.


हनी ट्रॅप करून कोणाला खंडणी मागितली जात असेल तक्रार करा, पोलिसांंचं आवाहन


सदरची कारवाई यशस्वी करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 
या प्रकरणात आतापर्यंत 3 महिलांचा समावेश असल्याचं स्पष्ट झाल्याने या मागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोबतच या रॅकेट मार्फत आतापर्यंत किती जणांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्यात आलं आहे याचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी अशा प्रकारचा हनी ट्रॅप करून कोणाला खंडणी मागितली जात असेल तर त्यांनी पोलिसांना याबाबत भेटून तक्रार करावी असं आवाहन केलं आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी हमी पोलिसांनी दिली आहे.