Chandrapur Ballarpur Slab Collapce: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेत 13 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना तातडीची मदत करीत रेल्वे प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिकेद्वारा रुग्णालयात पोहोचवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 यांना जोडणारा हा पादचारी पूल असून संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान या पुलाचा एक भाग कोसळला. पादचारी फुलाचा भाग कोसळल्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेने ओव्हर हेड वायरसह पादचारी पुलाचा भाग पुन्हा एकदा दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं आहे. या अत्यंत वर्दळीच्या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मोठ्या संख्येत रेल्वे कर्मचारी अभियंते रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. हा पूल सुमारे 40 वर्ष जुना होता. सहा ते आठ महिन्यांपूर्वी या पुलाची पाहणी करण्यात आली होती. रेल्वे प्रवाशांच्या अधिकच्या वजनाने हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल
बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने जखमी सर्वांना तातडीची मदत करीत रेल्वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत. यापैकी काही रुग्णांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी कळताच राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत सर्व जखमींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधीक्षक परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्लारपूर येथील पदाधिकारी रेल्वे स्टेशनवर पोहोचून त्यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
ही बातमी देखील वाचा