Chandrapur News :  चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी येथील MIDC परिसरात धारिवाल पावर प्लॅटच्या विविध समस्यांसंदर्भात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या उत्तरावर समाधानी नसल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. या पावर प्लांटच्या संदर्भात एक समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना धारिवाल कंपनीने केलेल्या प्रदूषणासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी सह-सचिवांच्या माध्यमातून 90 दिवसाच्या आत चौकशी केली जाईल आणि  सदर कंपनी दोषी आढळल्यास शासनामार्फत कारवाई केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री यांनी दिले. 


धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. प्लॉट नं.सी.-6, सी-7 व सी-8 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ताडाळी, ता. जि. चंद्रपूर हा कोळशावर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. सदर प्रकल्पामध्ये 600 मेगावॅट वीजनिर्मिती होते. धारिवाल पावर प्लांट अस्तित्वात आल्यापासून प्लांटमध्ये जुन्या मशनरींचा वापर होत आहे. प्लांटमुळे सभोवतालच्या परिसरात प्रदूषण होत असल्याचे जुलै महिन्यात निदर्शनास आले. या प्लांटद्वारे वर्धा नदीच्या पात्रातून पाणी चोरी केली जाते. या प्लांटमुळे तयार होणारी राख शेतकऱ्यांच्या शेतात पसरून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. कंपनीद्वारे शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळत नाही. या कंपनीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी  आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. 


मागील काळात दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून सदर पावर प्लांटच्या विरोधात आंदोलन उभारले होते. त्यादरम्यान आज उत्तर दिलेल्या अधिकाऱ्यांनी सदर पावर प्लांटच्या संदर्भात अनेक त्रुटी काढल्या होत्या. त्या पावर प्लांट संदर्भात असणाऱ्या त्रुटींची काही छायाचित्रे देखील आज उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. मात्र, लक्षवेधी दरम्यान धारीवाल पावर प्लांटच्या संदर्भात असमाधानकारक उत्तरे देऊन दिशाभूल केली जात आहे.  


आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, एमआयडीसी ताडाळी येथे असलेला धारिवाल विद्युत प्रकल्प हा बेकायदेशीररित्या कार्यान्वित आहे. धारिवाल विद्युत प्रकल्पात पाणी स्टॉक करण्याकरिता जो रिझर्व वायर आहे तो पूर्णपणे चुकीचा बांधला आहे. संपूर्ण भारतात कुठल्याही विद्युत प्रकल्पात असा बांधला गेलेला नाही. त्या चुकीच्या बांधकामामुळे तो पाणीसाठा बाराही महिने झिरपत असतो. त्यांच्यामुळे लगतच्या परिसरातील शंभर एकर शेती बाधित होत आहे. संबंधित कंपनी शेतकऱ्यांना कुठलीही नुकसान भरपाई देत नाही.  


धारिवाल विद्युत प्रकल्पाला जो पाणीपुरवठा वढा या गावावरून होतो, त्या गावातील नदीपात्रात या कंपनीने अवैध इंटक वेल बांधलेला आहे. कुठल्याही विद्युत प्रकल्पाचा इंटक वेल हा नदीपात्रात नसतो. कंपनीने पुन्हा चार पंप अवैधरित्या नदीच्या खोल भागात प्रवाह बदलून टाकला असल्याने उन्हाळ्यात आसपासच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा व जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 


धारिवाल कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे लगतच्या दहा ते पंधरा गावांना विविध आजारांनी ग्रासले आहे. शेत पिकांवर सुद्धा कोळशाच्या राखेचा थर जमा होऊन शेत नापिकी होत असल्याचे दिसून येत आहे. धारिवाल विद्युत प्रकल्प हा चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर स्थित असल्याने सदर प्रकल्पात येणारे ट्रक व ट्रेलर्स हे राज्य महामार्गावर उभे असतात. त्यामुळे वाहतुकीचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या जड वाहनांमुळे अनेक अपघात झाले आहेत. सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. 


भाजपचे आमदार आशिष शेलार असमाधानी 


दरम्यान उद्योग मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मत व्यक्त करताना मंत्र्यांच्या उत्तरात तफावत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सदर कंपनीने प्रदूषण केल्याचे स्पष्ट झालेले असताना पुन्हा चौकशी करून कारवाई केली जाईल, असे दिलेले आश्वासन संयुक्तिक वाटत नाही, अशी टीका देखील शेलार यांनी केली आहे.