चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपणा (Korpana) येथील अल्पवयीन मुलीवर ज्युनिअर IAS class घेण्याच्या बहाण्याने शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक केली. आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. 


बदलापूमधील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यात महिला व अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून याबाबत कडक पाऊले उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी दररोज नव्या ठिकाणावर अत्याचाराच्या घटना समोर आहे. चंद्रपूरमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल याची आम्हाला खात्री 


आज भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कोरपणा येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या आईचे कौतुक केले आहे. पीडित मुलीच्या आईच्या हिंमतीमुळेच या प्रकरणाला वाचा फुटली असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गरीब घरातल्या एका मुली सोबत झालेला हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानमध्ये काय काय चालतंय हे आम्हाला पाहायला मिळालं. या प्रकरणात पीडित मुलगी एकटी नसून आणखीही मुलींचं शोषण झाल्याची शक्यता आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल याची आम्हाला खात्री असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.


नेमकं प्रकरण काय? 


चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपणा येथे उन्हाळ्यात ज्युनिअर IAS class घेण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकी देत आरोपीने पीडित मुलीला धमकावले. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक केली. या प्रकरणातील आरोपीला अकोल्यातून अटक करण्यात आली. आरोपी हा युवक काँग्रेसचा (Congress) कोरपणा शहराध्यक्ष आहे. तर संबंधित शाळेच्या संचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला.