नागपूर : म्यानमार मार्गे गेल्या चार महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून वनविभागातील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली. वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसा पुरविणाऱ्या मिझोराम येथील जमखानकप या आरोपीच्या अटकेनंतर हा धक्कादायक खुलासा झाला.


तब्बल एक दशकानंतर मध्य भारतातील वाघ पुन्हा एकदा शिकाऱ्यांच्या रडारवर आले आहे आणि या शिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाघांच्या कत्तली केल्याचं आता उघड होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून जानेवारी महिन्यात बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला अटक करण्यात आली आणि संपूर्ण देशातील व्याघ्रप्रेमींच्या काळजात धस्स झालं. बरोबर एक दशक आधी वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या याच बहेलिया आणि बावरिया टोळ्यांनी विदर्भासह मध्य भारतात मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार केली होती.


वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या अजित राजगोंड अटक प्रकरणात वनविभागाच्या विशेष तपास पथकाने शिकारी टोळीचे हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधून काढले आहेत. पूर्वोत्तर राज्यातील मिझोरम आणि मेघालय या राज्यातून अटक करण्यात आलेले जमखानकप, निंग सॅन लुन आणि लालनेईसंग हे तीन आरोपी चीनमध्ये म्यानमार मार्गे वाघांची तस्करी करत असल्याचं उघड झालं आहे. 


पूर्वोत्तर राज्यातून अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींच्या चौकशीतून चीनमध्ये तस्करी करण्यात आलेले सर्व वाघ हे मध्य प्रदेश आणि विदर्भातीलच असल्याची सूत्रांची माहिती आहे.


बहेलिया टोळी मध्य भारतात सक्रिय



  • बहेलिया टोळी गेल्या दोन दशकांपासून मध्य भारतात वाघांच्या शिकारीत सक्रिय आहे.

  • 2010 मध्ये सीबीआयने नागपूर रेल्वे स्टेशन र अजित आणि त्याच्या भावाला वाघाच्या कातडीसह अटक केली होती. हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यात मारल्याचा संशय होता.

  • 2012 आणि 2013 मध्ये देखील चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या अनेक घटना झाल्या पण पुरावे मिळाले नाही.

  • त्यानंतर मेळघाटात 2013 ते 2015 दरम्यान वाघाच्या शिकारीच्या किमान 19 घटनांमध्ये बहेलिया टोळीचा सहभाग दिसून आला.

  • आता विदर्भ आणि मध्यप्रदेशात या टोळीने किमान 15 वाघांची शिकार केल्याचं समोर आलं आहे.


मात्र सर्वाधिक प्रगत तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि हजारो कोटींचा निधी मिळून देखील वनविभाग या शिकाऱ्यांना का थांबवू शकला नाही हा प्रश्न मोठा गंभीर आहे.


मुख्य म्हणजे गुरुवारी न्यायालयीन मित्र असलेल्या अॅडव्होकेट सुधीर तोडीतेल यांनी विदर्भात गेल्या 5 वर्षात 160 वाघांच्या मृत्यूची माहिती मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठांसमोर निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे नागपूर खंडपीठाने पुढील 3 आठवड्यात वाघांच्या मृत्यू संदर्भातील सर्व माहिती कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 


ही बातमी वाचा: