चंद्रपूर : वाघांच्या शिकारीसंदर्भात (Tiger Poaching) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले असून म्यानमारमार्गे (Myanmar) गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये (China) तस्करी झाल्याची माहिती पुढे आली आहे. वनविभागातील खात्रीलायक सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. यात वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या अजित राजगोंड अटक प्रकरणात वनविभागाच्या विशेष तपास पथकाने शिकारी टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन हुडकून काढले आहे. 

दरम्यान, वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसा पुरविणाऱ्या मिझोराम राज्याची राजधानी आयजोल येथून जमखानकप नावाच्या एका व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली होती. तर या आधी मेघालय राज्याची राजधानी असलेल्या शिलॉंग येथून  लालनेईसंग आणि निंग सॅन लुन यांना देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पूर्वोत्तर राज्यातील या 3 आरोपींच्या चौकशीतुन ही धक्कादायक माहिती आता समोर आली. 

पुढील 3 आठवड्यात वाघांच्या मृत्यू संदर्भातील माहिती सादर करा-  न्यायालय 

मुख्य म्हणजे काल(21 फेब्रुवारी) न्यायालयीन मित्र असलेल्या ॲडव्होकेट सुधीर तोडीतेल यांनी विदर्भात गेल्या 5 वर्षात 160 वाघांच्या मृत्यूची माहिती मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर निदर्शनास आणली. त्यामुळे नागपूर खंडपीठाने पुढील 3 आठवड्यात वाघांच्या मृत्यू संदर्भातील सर्व माहिती कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र वनविभागासोबतच केंद्रीय वन विभाग, सीबीआय, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण संस्थेलाही (WCCB) प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे वाघाच्या शिकारी संदर्भात सर्व माहिती कोर्टासमोर सादर करायची असल्याचे कारण देत चंद्रपूर वन विभागाचा या प्रकरणात काहीही बोलण्यास नकार दिल्याचे ही पुढे आले आहे.  पूर्वोत्तर राज्यातून अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींच्या चौकशीतून चीनमध्ये तस्करी करण्यात आलेले सर्व वाघ हे मध्य प्रदेश आणि विदर्भातीलच असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. 

वाघ व बिबट्याच्या अवयव विक्री प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक 

गोंदियाच्या सडक अर्जुनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाघ आणि बिबट्याची शिकार करून अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचून सडक अर्जुनी येथून अटक केली होती. या तीन आरोपींची चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून वन अधिकाऱ्यांनी आणखी दोन आरोपींना गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून बिबट्याची कातडे जप्त करण्यात आली आहे. नकुल प्रल्हाद शहारे (58) रा. कोहका व जितेंद्र गोविंदराम कराडे (30) रा. कोडगूल, ता. कोरची जिल्हा गडचिरोली असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.

हे ही वाचा