Chandrapur News : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीला अक्षरश: मृत्युच्या दाढेतून परत आणलं. या व्यक्तीने वाघाच्या (Tiger) तावडीतून पत्नीला सोडवल्याची घटना समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील ढोरपा गावातील ही घटना असून सविता भुरले असं जखमी महिलेचं नाव आहे. तर सोमेश्वर भुरले असं जिगरबाज व्यक्तीचं नाव आहे. रविवारी सकाळी शेतात काम करतांना ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर त्यांच्या पतीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नेमकं काय घडलं?


सोमेश्वर भुरले रविवारी सकाळी आपल्या पत्नीसह शेतात काम करत होते. सविता या धान कापणीनंतर जमिनीवर पडलेल्या धानाच्या ओंब्या वेचत होत्या तर सोमेश्वर हे जवळच गवत कापत होते. यावेळी बेसावध असलेल्या सविता यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. आपल्या जबड्यात सविता यांची मान धरून वाघ ओढून नेत असतांना त्यांच्या किंचाळण्याने सावध झालेल्या सोमेश्वर यांनी त्यादिशेने तातडीने धाव घेतली. वाघाच्या जबड्यात आपल्या पत्नीला पाहून त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र याही अवस्थेत सोमेश्वर यांनी हिंमत न हारता कुऱ्हाड घेवून वाघाच्या दिशेने धाव घेतली. वाघाला कुऱ्हाड फेकून मारत असल्याची हूल दिली. यामुळे वाघाचे लक्ष विचलित झाले आणि तो जखमी सविता यांना तिथेच टाकून निघून गेला.


या नंतर सोमेश्वर यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावलं आणि त्यांच्या मदतीने जखमी पत्नीला दवाखान्यात दाखल केले. सध्या या जखमी महिलेवर ब्रम्हपुरी च्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्या मानेला जबर दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल कऱण्यात आले आहे. या घटनेनंतर वनविभागाने या परिसरात गस्त वाढवली असून शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.


साधारण वर्षभर आधी अशाच प्रकारे एका आईने बिबट्याच्या जबड्यातून आपल्या चिमुकल्या मुलीला सोडविल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली होती. प्राजक्ता मेश्राम ही ६ वर्षांची मुलगी चंद्रपूर शहराजवळील जुनोना गावातील रहिवासी आहे. आई सोबत जंगलात गेलेल्या प्राजक्ता वर बिबट्याने हल्ला केला आणि तिचं डोकं तोंडात धरून बिबट्या नेत असतांना प्राजक्ताच्या आईने म्हणजे अर्चना मेश्राम यांनी अतिशय हिंमतीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला आणि मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली होती.


पालघरमध्ये वाघाचा वृद्ध महिलेवर हल्ला; 72 वर्षीय पतीने पत्नीचा जीव वाचवला 
याआधी पालघर जिल्ह्यातही आठ महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. मोखाडा तालुक्यात 18 मार्च 2022 रोजी रात्री दहा वाजता वाघाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केला. या वृद्ध महिलेच्या पतीने दाखवलेलं प्रसंगवधान आणि धाडसामुळे या महिलेचे प्राण थोडक्यात बचावले. पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील पारध्याची मेट इथल्या शेतावर राहणाऱ्या काशिनाथ सापटे (वय 72 वर्ष) आणि त्यांची पत्नी पार्वती सापटे (वय 65 वर्ष) हे रात्री झोपले असताना बाहेर कसला तरी आवाज आला. या आवाजाचे कारण बघायला पार्वती सापटे उठल्या आणि घराबाहेर पडताच अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केला. त्यांचा आवाज आल्यावर त्यांचे पती काशिनाथ सापटे यांनी वाघाचा प्रतिकार करुन आपल्या पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडवले. मात्र वाघ पळून न जाता तिथेच बसून राहिला. हे पाहून या दोघांनी आरडाओरड केली, त्यांचा आवाज ऐकून पारध्याची मेट येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन, वाघाला पिटाळून लावले. या हल्ल्यात महिला जखमी झाली होती.


मृत्युचं सोंग घेत वाघाच्या तावडीतून सुटका
तर दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एका वाघाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने मृत्यूचे सोंग घेत आपला जीव वाचवल्याच दिसत होतं. हा व्हिडीओ भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी गावातील होता. वाघाच्या या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. या व्हिडीओमध्ये वाघ चक्क एका तरुणाच्या अंगावर बसला. परंतु, या तरुणाने मृत्यूचे नाटक करत आपली सुटका केली.