चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात (Tadoba National Park ) लवकरच अस्सखलित इंग्रजी बोलणारे गाईड तुम्हाला दिसणार आहे. यासाठी ताडोबा प्रशासनाने येथील गाईड्ससाठी इंग्लिश स्पिकिंगचे विशेष क्लास सुरु केले आहेत.


 ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आपल्या राज्यातीलच नाही तर जगाच्या नकाशावर अतिशय लोकप्रिय असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. यामुळेच वर्षभर ताडोबा हे देशी-विदेशी पर्यटकांनी गजबजलेला असतो. ताडोबा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ असल्यामुळे देश-विदेशातून इथे पर्यटक येतात. मात्र दक्षिण भारतातून आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मराठी व हिंदी येत नसल्याने स्थानिक गाईड त्यांना ताडोबाची माहिती देऊ शकत नाहीत. हीच अडचण ओळखून पर्यटकांना टायगर सफारी घडविणाऱ्या गाईड्ससाठी आता ताडोबा प्रशासनाच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे विशेष क्लास सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे.  


ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. सोबतच ताडोबातील गाईड हे स्थानिक आदिवासी असल्याने आणि त्यांचं शिक्षण अतिशय जुजबी असल्याने त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. त्यामुळे जंगलाची आणि निसर्गाची इत्यंभूत माहिती असून देखील ताडोबातील गाईड्स पर्यटकांशी संवाद साधू शकत नाहीत. त्यामुळेच येथील गाईड्ससाठी क्लास सुरू करण्यात येणार आहेत. 


भाषा हे खरं तर संवाद साधण्याचं एक माध्यम आहे. पण हीच भाषेची अडचण ताडोबाच्या ग्लोबल इमेजला धक्का लावणारी ठरतेय. मात्र ताडोबा प्रशासनाने काळाची पावलं ओळखून वेळेतच ही अडचण दूर करण्याचा केलेल्या प्रयत्न स्त्युत्य असाच म्हणावा लागेल, अशा भावना येथील गाईड्सकडून व्यक्त करण्यात येत आहेत.  


चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध व्याघ्र दर्शन केंद्र आहे. यामुळच येथे देशभरातील पर्यटकांसह परदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने येथे येत असतात. या पर्यटकांना सफारीसाठी एक गाईड दिला जातो. हा गाईड पर्यटकांना जंगल आणि प्राण्यांची माहिती देत असतो. परंतु,सध्या कार्यरत असलेले गाईड्स हे माहितीच्या दृष्टीनं परिपूर्ण आहेत. परंतु, त्यांना  इंग्रजी भाषेचं ज्ञान नाही. त्यामुळेच त्यांना आता इंग्रजी भाषा शिकवली जाणार आहे. 


दरम्यान, या पूर्वी म्हणजे 2020 ला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात  गाईडची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी करण्यात आली होती. यासोबतच मराठी आणि हिंदी भाषेसोबतच इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक केलं आहे. देशी-विदेशी पर्यटकांशी योग्य संवाद साधला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. 


महत्वाच्या बातम्या


Environment Day : तारु देवाच्या नावाने ताडोबा जंगल, तारु आणि वाघामध्ये तुंबळ युद्ध... आता वाघाला मानतात कुलदैवत