चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'ओयो'बाबत विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. ओयो हे ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या 15 हॉटेल्सवर चंद्रपूर पोलिसांनी कारवाई केली. अहमदाबाद येथील ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.


ओयोकडून आलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील सर्वच हॉटेलची तपासणी सुरू केली. या तपासणीत आतापर्यंत 15 हॉटेल अनधिकृतपणे ओयो ब्रॅण्डचा दुरूपयोग करत असल्याचे निदर्शनास आले आहे.


Chandrapur Police Action On OYO : ओयो ब्रँडचा परवानगीविना वापर


चंद्रपूर शहरातील 15 हॉटेल आणि लॉजच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ओयो हे ट्रेडमार्क वापरून चंद्रपूर शहरातले अनेक हॉटेल्स अवैध धंदे करत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात ओयो सलग्न फक्त 4 हॉटेल्स असून ओयोचा दुरुपयोग करून अनेक हॉटेल्स आपला व्यवसाय करत आहेत.


Sudhir Mungantiwar On OYO : काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवर?


पावसाळी अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल संबंधी प्रश्न उपस्थित केला होता. ओयोमध्ये एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? शहरांपासून दूर असणाऱ्या या हॉटेल्समध्ये नेमकं काय सुरु असते? हा अभ्यासाचा विषय आहे, याचा पोलीस विभागाने अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.


सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, "ओयो नावाची एक हॉटेल चेन तयार झाली आहे. शहराच्या 20-20 किमी दूर एका निर्जन ठिकाणी OYO... मग मनात शंका आली की ही OYO हॉटेल चेन काय आहे? ही अतिशय गंभीर बाब असून त्यामध्ये सरकारने लक्ष देण्याची आहे. या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही. कोणत्याही महापालिकेची परवानगी घेतली जात नाही. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने मिळते, ही कशासाठी दिली जाते, हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे.


OYO च्या माध्यमातून 20 -20 किलोमीटर वर कोणीही प्रवासी जाऊन राहत नाही. हा प्रवासी तिथं गेला म्हणजे त्याच अर्थशास्त्र कच्च आहे. कारण OYO पेक्षा शहरातील एका हॉटेलमध्ये राहणे जास्त स्वस्त आहे. असेही सुधीर मुनगंटीवर म्हणाले.


'खरंतर हे संस्कृती रक्षकांचं सरकार आहे, इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर सरकारने त्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यांनी OYO चा अभ्यास करावा आणि महाराष्ट्रात किती OYO आहेत, याची माहिती मंत्र्यांनी देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये केली होती.



ही बातमी वाचा: