चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यात काल पहाटे एका पट्टेदार वाघाने शेतात झोपेत असलेल्या मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. मात्र या कुटुंबाने वाघाशी (Tiger) झुंज देत त्याचा हल्ला परतवून लावला. दुर्दैवाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या या वाघाचा देखील मृत्यू झाला आहे.
वाघाच्या हल्ल्यातून वाचलेल्या दूरकीवार कुटुंबियांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती असच म्हणावं लागेल. या कुटुंबावर आलेला प्रसंग अंगावर काटा आणणारा असाच आहे. पोंभूरणा तालुक्यातील नांदगाव येथील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात राहुटीला होते. मात्र रात्री दीड वाजताच्या सुमारास झोपेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला. यावेळी बाजूलाच झोपेत असलेल्या पती सुरेश दूरकीवार व मुलगा पंकज दूरकीवार यांनी महिलेला वाचवण्यासाठी वाघाशी जोरदार झुंज दिली.
म्हशींच्या कळपासोबत वाघाची झुंज
या प्रतिकारात दूरकीवार कुटुंबातील तिघेही जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर हा वाघ लगतच्या येसगाव शेतशिवारात गेला आणि त्याठिकाणी त्याने गणेश सोनूले या शेतकऱ्यावर त्याने हल्ला केला. मात्र गणेश सोनूले याने देखील वाघाचा हा हल्ला परतवून लावला. त्यानंतर लगतच्या चक-दुगाळा भागात म्हशींच्या कळपासोबत या वाघाची झुंज झाली.
रेस्क्यू करण्याआधीच वाघाचा मृत्यू
वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र वाघाला रेस्क्यू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हा वाघ दुरकीवार कुटुंबियांनी केलेल्या प्रतिकारात जखमी झाला, गणेश सोनूले या शेतकऱ्याने बचावासाठी केलेल्या हल्ल्यात जखमी झाला की म्हशींच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात दगावला हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र
चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 900 गावं ही जंगलव्याप्त म्हणजे जंगलालगत आहेत. त्यामुळे वर्षभर या भागात पाळीव जनावरं आणि माणसांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होत असतात. त्यामुळे हा भाग कायम वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली असतो. विशेषतः गेल्या काही वर्षात संरक्षणाचे उपाय चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्यानं जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 50 लोकांचा वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हा गेल्या 10 वर्षातला उच्चांक आहे. उन्हाळ्यात तर संघर्ष अगदी शिगेला पोहोचतो. उन्हाळ्यात पाण्यांचे स्रोत आटल्यानं जंगली जनावरं गावाकडे वळतात आणि कळत-नकळत हल्ले होतात