Chandrapur rain latest News Update : मुंबई, पुण्यासह राज्यभर 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. राज्यभरात आज पावसाने धुमाकूळ घातलाय. विदर्भातही पावसाने हजेरी लावली. चंद्रपूरमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे चंद्रपूरमधील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 


अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालय बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना बुधवारची (19 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत. नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. 


चंद्रपूर शहरात गेल्या 24 तासात 195 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर शहरात आज सकाळी 10 पासून दुपारी 4 पर्यंत धुवांधार पाऊस बरसला. चंद्रपूर महानगरपालिकेची आकडेवारी, शहरातील अनेक सखल भाग आणि रस्ते जलमय झाले आहेत. सुदैवाने पाऊस थांबल्याने जलमय भागातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. 19 तारखेलाही चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. 


नांदेडमध्ये सखल भागात पाणीच पाणी


नांदेडमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने सखल भाग जलमय झालाय. या निमित्ताने मनपाच्या नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचे दिसून आलंय. शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले असून काही व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. आज दिवसभर संततधार पाऊस बरसत असल्याने एकूणच नांदेडचे जनजीवन विस्कळीत झालंय. नांदेडमध्ये आज सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे, या मोसमातील पहिलाच दमदार पाऊस आज नांदेड करांनी अनुभवलाय. आजच्या पावसाने जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. त्यासोबतच जलसाठ्यात वाढ होण्यास देखील मदत होणार आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत नांदेडमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसत असल्याने नांदेडकर आनंदी झालेले दिसतायत.