Chimur Ghoda Yatra : संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील चिमूरच्या (Chimur) घोडा यात्रेला (Ghoda Yatra) वसंतपंचमीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची (Shri Hari Balaji) लाकडी घोड्याच्या रथावरुन काढण्यात येणारी भव्य मिरवणूक. काल (3 फेब्रुवारी) रात्री मोठ्या उत्साहात ही मिरवणूक यात्रा पार पडली. विशेष म्हणजे जगन्नाथ पुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं आणि त्यानंतर तिची पहाटे पाच वाजेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती. 


पेशव्यांच्या काळापासून घोडा यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात


साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी चिमूर गावातील भिकाजी पाटील डाहुले या स्थानिक व्यक्तीच्या घरी पायवा खोदला जात असताना त्यांना खोदकामात एक पुरातन बालाजी मूर्ती सापडली होती. मात्र या घोडा यात्रेला पेशव्यांच्या काळापासून खरी सुरुवात झाली. पेशवाईतल्या साडे तीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी या मंदिराची निर्मिती केली आणि तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली. 


महाशिवरात्रीला यात्रेची सांगता


महाराष्ट्राचे तिरुपती या नावाने प्रसिद्ध असलेल्या चिमूरचे श्रीहरी बालाजी देवस्थान, या प्रसिद्ध मंदिरात दरवर्षी मिनी माघ शुद्ध पंचमीला नवरात्र प्रारंभ होते. मिनी माघ त्रयोदशीला रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत भव्य लाकडी घोड्यावरुन श्रीहरी बालाजी महाराजाच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीला रात घोडा असं म्हटलं जातं. या रात घोड्याला पंचक्रोशीतील लाखो भाविक हजेरी लावून बालाजी महाराजांचं दर्शन घेतात तर तिसऱ्या दिवशी दुपारी 12 ते 3 वाजता गोपालकाला करुन मुख्य यात्रेची समाप्ती करण्यात येते. चिमूरची घोडा रथ यात्रा सलग 15 दिवस चालते आणि महाशिवरात्रीला यात्रेची सांगता करण्यात येते.


भाविकांच्या मनात मंदिराचं विशेष स्थान


या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील हजारो लोक चिमूरमध्ये दाखल होतात. तिरुपती बालाजीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे सुद्धा या काळात चिमूरमध्ये लोकांची मोठी गर्दी होते. 1942 मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये सुद्धा या बालाजी मंदिराची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतरही लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे.