Teachers Constituency Election Nagpur : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर महाविकास आघाडी आणि विमाशीचे उमेदवार सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात अतिशय चुरशीचा सामना झाल्याने सर्वांचेच समर्थक धास्तावले आहेत. 


तिनही उमेदवार विजयाचा दावा करीत असले तरी कोणालाच खात्री नसल्याने आता सुरू असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार नागोराव गाणार यांना अडबाले आणि झाडे यांनी यावेळी कडवी लढत दिली. 


शेवटच्या टप्प्यात 'जाती'वर मतदान?


मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात या निवडणुकीला 'जाती'कडे वळवण्यात आल्याने आघाडी आणि भाजपचीही अडचण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अडबाले यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या मतदारांकडून मोठ्या आपल्या जिल्ह्यातील माणसाला विधान परिषदेत पाठवा ही भावना त्यांनी व्यक्त केली होती. यात त्यांना बरेच यश आल्याचे समजते. येथील जवळपास 80 टक्के मतदान अडबाले यांना झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांचा आहे.


महाविकास आघाडीचे 30 टक्क्यांचे गणीत?


नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा येथून 30 टक्के मते मिळाली तरी अडवाले आरामात निवडून येतात, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र झाडे यांनाही या दोन जिल्ह्यातून सुमारे 30 टक्के मते मिळतील असे वाटत आहे. नागपूर, भंडारा आणि वर्धा या तीन जिल्ह्यातून झाडे यांना मोठ्या अपेक्षा आहेत. दोघांच्या मतांमध्ये होणारी विभागणी आणि चंद्रपूर-गडचिरोली-भंडारा या जिल्ह्यातील तूट गाणार यांनी नागपूरमधून भरून काढली तरच त्यांचा टिकाव लागू शकतो. या गुंतागुंतीमुळे बारीकसारिक नियोजन आणि आकडेमोड करणारे भाजपचे प्लानरही बुचकाळ्यात पडले आहेत. 


पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांकडून अपेक्षा भंग


सीबीएसई शाळांच्या संचालकांनी फारसे सहकार्य केले नसल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रथमच मतदान करणाऱ्या सीबीएसई शाळांमधून पन्नास टक्केच मतदान झाले. याशिवाय मतदान कसे करायचे याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांची मते मोठ्या प्रमाणात अवैध ठरण्याचा धोका वर्तविला जात आहे. ही गाणार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानल्या जाते. याशिवाय वर्धेत शिक्षक परिषदेच्या एका उमेदवाराने बंडखोरी केली आहे. या तीनही उमेदवारांच्या मतदानाची सरासरी आकडेवारी जवळपास असल्याने धक्कादायक निकालाची शक्यता नाकारता येत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Government Ayurved College: नागपूर शासकीय आयुर्वेद कॉलेजमधील एमडीच्या 46 जागा घटल्या; विद्यार्थ्यांमध्ये असंतोष