चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur News)  राजुरा शहर महिलेच्या हत्येनं हादरलं आहे. भाजयुमोचा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे याची पत्नी पूर्वशा डोहेला तीन गोळ्या लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला, तर लल्ली शेरगिल ही व्यक्ती जखमी आहे. सचिन डोहे हा कोळसा व्यवसायाशी संबंधित आहे. रविवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमाराला सचिनकडे काम करणारा लल्ली शेरगिल आणि दोन हल्लेखोरांमध्ये वाद झाला, आणि यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.


चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात आरोपींनी केलेल्या गोळीबारात पूर्वशा सचिन डोहे या 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्ड येथील ही घटना असून पूर्वशा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी आहे. गोळीबारात लल्ली शेरगिल या 35 वर्षीय व्यक्तीला एक गोळी लागल्याने तो देखील जखमी आहे. रात्री नऊ च्या सुमारास दोन अज्ञात आरोपींनी सचिन डोहे यांच्या घरासमोर गोळीबार केला. यात पूर्वशा यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन डोहे हा कोळसा व्यवसायाशी संबंधित असून लल्ली त्यांचा कडे काम करतो. रविवारी संध्याकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान सचिन डोहेच्या घराजवळ गोळीबार करणारे दोन आरोपी आणि लल्लीमध्ये वाद झाला आणि आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी लल्लीने सचिनच्या घराकडे धाव घेतली मात्र या वेळी घराबाहेर आलेल्या पूर्वशाचा गोळीबारात मृत्यू झाला. जखमी लल्ली यास चंद्रपूरला हलविण्यात आले असून या घटनेमुळे राजुरा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघेही हल्लेखोर सध्या फरार आहेत नेमका गोळीबार कोणत्या कारणासाठी झाला याबाबत अजून निश्चित कारण समोर आलेले नसून जिल्हा पोलीस या प्रकरणाचा  कसून तपास करतंय.