Chandrapur Flood : राज्यभरात चांदा ते बांदा पावसाने धुमाकूळ घातला. नदी नाले तुडुंब वाहू लागले. परिणामी राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत झालं. त्यातच महाराष्ट्राच्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील करंजी गावातून हृदय हेलावणारं चित्र समोर आलं. गुडघाभर पाण्यातून वाट काढत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली. याचं कारण स्पष्ट आहे, गावात पूल नाही आणि स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही. हे करंजी गाव माजी मदत व पुनर्वसन मंत्री आणि विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांचं आहे.


काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांचं जन्मस्थळ असलेल्या करंजी गावातून झाली होती. परंतु त्या गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यसंस्कारासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली.


महत्त्वाचं म्हणजे आजादी गौरव पदयात्रेत या जिल्ह्यातील तीन काँग्रेस आमदार सहभागी झाले आहे. एक आमदार याच भागाचं प्रतिनिधित्त्व करतो. तरीही देखील ग्रामीण भाग विकासापासून किती दूर आहे याची प्रचिती येते. करंजी गावात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गात कोणताही पूल नाही. परिणामी कच्च्या रस्त्यावर पुराचं पाणी आलं. त्यातच गावातील रवी अतराम यांचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावं लागलं.


गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गाव हे आमदार विजय वडेट्टीवार यांचं जन्मस्थळ आहे. त्यामुळेच त्यांनी या करंजी गावातून काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात केली होती. पदयात्रेच्या दोन दिवसांनी या गावातील हा आश्चर्यचकित करणारा फोटो समोर आला. पाच हजार लोकसंख्या असलेल्या करंजी गावात एक स्मशानभूमी बांधण्यात आली होती. परंतु नाल्यावरील पुलाच्या बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. पूल बांधण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. ग्रामपंचायतीनेही पुलाची मागणी केली, परंतु मंत्री असताना विजय वडेट्टीवार यांनी याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांची मरणानंतरही सुटका होत नाही. 


सोलापुरातही पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा
सोलापूर जिल्ह्यातही तीन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. पितापूर गावातील नूर सायबअली भांडारी यांचं 9 ऑगस्ट रोजी सकाळी निधन झालं. परंतु, अंत्ययात्रा काढण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्यात आली. बॅरलवर मृतदेह ठेवून जीव धोक्यात घालून नागरिकांनी ही अंत्ययात्रा काढली आहे. या अंत्ययात्रेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांतून प्रशासानाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील दृश्ये अतिशय भयावह आहेत. 


Chandrapur Flood : चंद्रपूरच्या करंजी गावात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा, गावकऱ्यांसमोर अडचणी



संबंधित बातम्या


Solapur : धक्कादायक! सोलापुरात चक्क पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ 


Wardha Rains : मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, वेणी इथे पुराच्या पाण्यातून मृतदेह गावाला नेण्यासाठी जीवघेणी कसरत