Chandrapur Rains : तापाने (Fever) फणफणलेल्या लेकीला खांद्यावर घेऊन चार किलोमीटर जंगलातून पायपीट करावी लागल्याचा दुर्दैवी प्रसंग चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पूरपरिस्थिती आहे. जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाल्यांना पूर (Flood) आला आहे तर अनेक मार्गावरील वाहतूक बंद पडली. अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी गावाला देखील पुराने वेढा दिला आहे. गावातील नथ्थू वागदरकर यांची दीड वर्षाची मुलगी लावण्या ही दोन दिवसांपासून तापाने फणफणत होती. मुलीची प्रकृती चिंताजनक झाली. मात्र पुराने वेढा दिला असल्याने उपचारासाठी न्यायचे कसे? हा मोठा प्रश्न आई-वडिलांना पडला. अशात दीड वर्षाच्या लावण्याला खांद्यावर घेत आई-वडिलांनी कन्हारगाव अभयारण्यातील घनदाट जंगलातून चार किमीचे अंतर पायी कापले. कोठारी पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. कोठारी पोलीस रुग्णवाहिका घेऊन मदतीला पोहोचले. मुलीला उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थिती सलग तिसऱ्या दिवशी देखील आहे तशीच कायम आहे. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून जिल्ह्यात गेल्या 24 तासात अवघा 5 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र वर्धा आणि वैनगंगा नद्यानी पात्र सोडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. निम्न वर्धा आणि उर्ध्व वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत वेगाने येत असल्याने इरई नदीचे पाणी चंद्रपूर शहरातील अनेक भागात शिरले आहे. वर्धा नदीच्या पाण्यामूळे भद्रावती तालुक्यातील पळसगाव, माजरी, पिपरी देशमुख या सारखी गावं पुराच्या पाण्याने वेढली गेली आहे. प्रशासनाने या भागात काही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तातडीने मदत करता यावी या साठी NDRF ची एक टीम देखील तैनात ठेवली आहे.
तर दुसरीकडे गोसेखुर्द धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीचं पाणी ब्रह्मपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये शिरलं आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अर्हेर-पिंपळगाव आणि बेलगाव येथे पुराचे पाणी शिरले असून रणमोचन, चिखलगाव, बेटाळा, खरकाडा, चिंचोली या सारख्या नदी शेजारी असलेल्या जवळपास 15 गावातील शेतशिवरात पुराचे पाणी जमा झाले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगेच्या किनारी असलेल्या गावांना पुराचा मोठा तडाखाब सला होता. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. आरमोरी मार्गावर वैनगंगेचं पाणी आल्याने ब्रह्मपुरी-गडचिरोली वाहतूक ठप्प देखील ठप्प झाली आहे.