Wardha Rains : वर्धा (Wardha) जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस (Rain) सुरु असल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पुलावरुन पुराचे (Flood) पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. यात हिंगणघाट तालुक्यातील पिपरी-जंगोना वेणी रस्त्यावरील पुलावरुन मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे नागपूर इथून रुग्णवाहिकेने (Ambulance) नेत असलेला मृतदेह (Dead Body) वेणी इथे पुरामुळे अडकला. अखेर मृतदेह अॅम्ब्युलन्समधून बाहेर काढला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मृतदेह हातात घेत पुराच्या पाण्यातून कशीबशी वाट काढत मृतदेह गावाला पोहोचवला. पुराच्या पाण्यातून करावी लागलेली ही कसरत कॅमेरात कैद झाली आहे.


मृत हर्षद घोरपडे हे आजारामुळे नागपूर इथे उपचार घेत होते. परंतु रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर मृतदेह अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी गावाला नेला जात होता. परंतु जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मृतदेह गावाला पोहोचवण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागली. मृतदेह नागपूर इथून अॅम्ब्युलन्समधून आणण्यात आला. परंतु वेणी इथे पुराचं पाणी पुलावरुन वाहत होतं. त्यामुळे रुग्णवाहिका चालकाला या पाण्यातून वाट काढणं कठीण होऊन बसलं होतं. अखेर मृतदेह अॅम्ब्युलन्समधून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी हर्षद घोरपडे यांचा मृतदेह हातात घेतला आणि पुराच्या पाण्यातून वाट काढत गावात नेला.


वर्ध्यात मुसळधार पाऊस, नदी-नाले तुडुंब
वर्धा जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे अनेक नदी नाले पुन्हा तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागला. परिणामी शेकडो नागरिकांच्या स्थलांतरही झालं. हिंगणघाट, आर्वी, देवळी या तालुक्यांना सर्वात मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला. त्यामुळे थोडा पाऊस जरी बरसला तरी अतिवृष्टीची भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना मोठे हाल सहन करावे लागले आहेत. आठवडाभराच्या काहीशा विश्रांतीनंतर 7 आणि 8 ऑगस्टच्या रात्रभर मुसळधार पाऊस बरसलेला. सकाळी देखील ढगाळ वातावरण आहे. बोर प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा अतिवृष्टीला सामोरे जाऊ लागू नये अशीच प्रार्थना नागरिक वरुणराजाकडे करत आहेत.