चंद्रपुर : जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच कारागृहातून सुटका झाल्यानंतर एका सराईत गुन्हेगाराने पैशासाठी एकाचा खून (Murder) केल्याची घटना घडली होती. त्या आरोपीला पोलिसांनी (Police) आता ताब्यात घेतलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. काहीच दिवसांपूर्वी त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर या आरोपीची शनिवारी (2 सप्टेंबर) रोजी कारागृहातून सुटका करण्यात आली. परंतु त्यानंतरही या गुन्हेगाराचे गुन्हे काही थांबले नाहीत. या घटनेमुळे संपूर्ण गोलबाजार परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिसांकडून आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
रविवार (3 सप्टेंबर) रोजी गोलबाजार परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका भिकाऱ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली. मधुकर मंदेवार वयवर्ष 65 असं या व्यक्तीचं नाव आहे. तर भूषण उर्फ अजय शालिकराम असं या आरोपीचं नाव आहे. रात्रीच्या वेळेस गोलबाजार परिसरात फिरताना पैसे हिसकवण्याचा प्रयत्न या आरोपीने केला. त्याला त्या भिकाऱ्याने विरोध केला. त्यावेळी त्यांच्यात काही किरकोळ वाद झाला.
त्या वादातूनच धारदार शस्राने आरोपीने त्या व्यक्तीची हत्या केली. दरम्यान काही किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. जेव्हा हा गुन्हेगार कारागृहातून बाहेर आला तेव्हा त्याने पैशांसाठी या भिकाऱ्याची हत्या केल्याचं उघड झालयं. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, सिटी पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही देखील तपसण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांच्या हाती फारशी माहिती लागली नाही.
पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी श्वान पथकाची देखील मदत घेतली आहे. ज्यावेळी या आरोपीने त्या भिकाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली त्यावेळी तो दारुच्या नशेत होता असं देखील समोर आलं आहे. व्यसनाधीन असल्यामुळे त्याला व्यसनासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने या भिकारी व्यक्तीची हत्या केल्याचं उघड झालं. पण पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी या आरोपीला अंचलेश्वर गेट परिसरातून अटक केली. या घटनेनंतर गोलबाजार परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. पण पोलिसांनी आरोपीला अटक केल्यामुळे नागरिकांमध्येही दिलासा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
चंद्रपुरातील या अशा घटनांनमुळे प्रशासन देखील आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासन देखील प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जातंय.