चंद्रपूर : चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba Andhari Tiger Reserve) ऑनलाईन बुकिंगसाठी चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामुळे ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय आगामी काळातील दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या बुकिंगचा (Online Booking) मार्ग मोकळा झाला आहे.
तोडगा निघेपर्यंत बुकिंग बंद ठेण्याचे होते आदेश
आर्थिक गैरव्यवहारामुळे वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या बुकिंग करणाऱ्या एजन्सीसोबत ताडोबा व्यवस्थापनाने करार रद्द केला होता. डब्ल्यूसीएस कंपनीवर 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वन विभागाने केला होता. त्यासंदर्भात वन विभागाने बुकिंग कंपनीच्या विरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र ऑनलाईन तिकीट बुकिंग कंत्राटच्या अटी आणि त्यातील बुकिंगचा अधिकार हा वाद न्यायालयात गेला होता. 2026 पर्यंत आपला करारनामा असताना ताडोबा व्यवस्थापनाने अचानक करार रद्द केल्याचं सांगत एजन्सीने चंद्रपूर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यावर सुनावणी करत तोडगा निघेपर्यंत ताडोबाच्या बुकिंग प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ताडोबातील सफारी बुकिंग प्रक्रिया ठप्प होती.
मात्र चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (31 ऑगस्ट) ही स्थगिती उठवत ताडोबाला सफारी बुकिंगसाठी परवानगी दिली. या निर्णयामुळे चिंतेत सापडलेल्या ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 4 ते 5 दिवसात ताडोबाची अधिकृत बुकिंग साईट सुरु होण्याची शक्यता आहे.
एजन्सीकडून फसवणूक
चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करणारी एजन्सी म्हणून चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनकडे जबाबदारी होती. जंगल सफारी बुकिंग करणाऱ्या याच एजन्सीने सुमारे 12 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. करारनाम्यानुसार गेल्या 3 वर्षात एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा या एजन्सीने केला. वारंवार पाठपुरावा करुनही उर्वरित रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. या एजन्सीने पैसे थकवल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याच्या पेमेंटला उशीर झाला होता आणि तेव्हाच या आर्थिक गैरव्यवहाराची चाहूल लागली होती.
हेही वाचा
Tadoba Tiger Reserve : ताडोबा येथे दाखल होणार सहा विशेष जिप्सी , ताडोबा कोर झोन सिझन 1 ऑक्टोबरपासून