चंद्रपूर : घुग्घुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भुस्खलनामुळे (landslide) परिसरातील इतरही घरांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही जीवितहानी होऊ  नये म्हणून जिल्हा प्रशासनाने (District Administration) सुरक्षेच्या कारणास्तव 400 बाय 150 मीटर परिसरातील 160 घरे खाली करून सदर कुटुंबांना स्थलांतरीत केले आहे. स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाचे घरभाडे व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी विकोली प्रशासनाने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी (Chandrapur Collector) अजय गुल्हाने यांनी दिले आहे.


26 ऑगस्ट 2022 रोजी घुग्घुस शहरातील आमराई वॉर्डातील रहिवासी गजानन मडावी यांचे घर अचानक भुस्खलनामुळे 60 ते 70 फूट जमिनीखाली गेले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हा प्रशासन, नगर पालिका प्रशासन, वेकोली प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन 50 मीटर परिसरातील घरे खाली करून सर्व कुटुंबांना नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत (Nagar Parishad Primary School) स्थलांतरीत केले.


शास्त्रीय कारण शोधण्याचे प्रयत्न


या घटनेचे शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केंद्र शासनाचे खाण सुरक्षा निर्देशालयाचे संचालक सागेश कुमार, वेकोलीच्या तांत्रिक विभागाचे गुप्ता, भुविज्ञान व खनिकर्म विभागाचे उपसंचालक सुरेश नैताम, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भुवैज्ञानिक मंगेश चौधरी, भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग नागपूरचे वरिष्ठ भुवैज्ञानिक भुपेश उरकुडे, आशिष बारसाकडे यांच्याशी संपर्क केला असून  त्यांच्यामार्फत उक्त जागेचे शास्त्रीय सर्वेक्षण व त्याची कारणमीमांसा आदी बाबी तपशीलवार तपासून घेण्यात येत आहे.


मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 हजारांची मदत


आमराई वॉर्डातील घटनास्थळापासूनचे एक हेक्टर क्षेत्र धोकादायक घोषित करण्यात आली आहे. सर्व घरे खाली करून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. सदर कुटुंबाच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था वेकोलीच्या प्रशासनाने करावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या सुचनेनुसार प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. खाण सुरक्षा निर्देशालय, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार घटनास्थळापासूनच्या 400 बाय 150 मीटर परिसरातील 160 घरे खाली करून उक्त जागेवर वावर करण्यास स्थानिकांना मनाई करण्यात आली आहे. तसेच स्थलांतरीत केलेल्या कुटुंबांना पुढील सुविधा होईपर्यंत भाडे तत्वावर घर घेऊन राहायचे असल्यास त्यांच्या मासिक भाड्याची रक्कम व प्राथमिक गरजांकरीता आवश्यक निधी वेकोली प्रशासनाकडून देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra Police : राज्यातील पोलिसांसाठी आनंदवार्ता, पोलिसांना हक्काचं घर मिळावं यासाठी सरकारची नवी योजना


Poha GST : नाश्ता महागला! गूळ आणि पोह्यांवर लागणार का जीएसटी, मंत्री पवारांनी सांगितले कारण