Chandrapur News Updates: पायाखालची जमीन सरकणं म्हणजे नेमकं काय याचा शब्दशः प्रत्यय काल चंद्रपुरातील घुग्गुस (Chandrapur Ghuggus) शहरात पाहायला मिळाला. घुग्गुसमधील एक घर चक्क 70 फूट जमिनीत उभं गाडलं गेलं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात ही घटना घडली आहे. काल या घराला अचानक हादरे बसायला लागले. त्यामुळे घरातील सदस्य धावत बाहेर आले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात हे घर कोसळलं आणि जमिनीत गायब झालं. इथे 70 फुटांचा खड्डाही पडला. कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची या भागात चर्चा आहे.


चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस शहरात  गजानन मडावी यांचं हे घर होतं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई वार्डात ही घटना घडली. या शहराशेजारी सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. गजानन मडावी यांचे राहते घर संध्याकाळच्या दरम्यान अचानक हलू लागल्याने भीतीमुळे घरातील सदस्य बाहेर पडले. त्यानंतर काही क्षणातच अख्खे घर 70 फूट जमिनीत गडप झाल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 


सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर 70 फूट गडप होण्याची ही धक्कादायक घटना प्रथमच उजेडात आली आहे. घटनास्थळी महसूल- खाण प्रशासन आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सध्या परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.


परिसरातील नागरिकांनी याआधीही कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे तिथल्या घरांचं नुकसान होत असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. वारंवार सांगून देखील याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. आता घुग्गुसमधील या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल केला जात आहे. अख्खं घरच गाडलं गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुदैवाने यावेळी घरातील लोक घराबाहेर पडल्यानं कुठली जीवितहानी झाली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या