Buldhana Unseasonal Rain : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा पाहायला मिळत आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळपासून मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यात अनेक भागात गारपीट झाल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. नुकसानीसह तापमानात मोठा गारवा निर्माण झाला आहे. चिखली, देऊळगाव राजा रोड बर्फाने झाकला गेल्याचे पाहायला मिळाले. अनेक भागात शेतात गारीचे खच दिसून आले. झाडावरील पक्षांना देखील गारपीटचा फटका बसल्याने शेकडो बगळे झाडावरून खाली कोसळले. त्यात बऱ्याच बगळ्याचा मृत्यू झाला आहे. तर, काही पक्षांनी गावातील घरांचा सहारा घेत जीव वाचवीला. तर, एका ठिकाणी भागवत कथा सुरू असताना वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला होता. अनेक वृद्ध भाविक मंडपा खाली दबल्या गेले होते. मात्र, प्रसंगावधान राखत गावातील तरुणांनी भाविकांची केली सुखरूप सुटका केली आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा तालुक्यात शेतातील गहू, हरबरा काढणीला आला होता. अवकाळी पावसामुळे त्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाला आहे. सतत तीन ते चार तास सर्वत्र वादळी पाऊस सुरु होता. यामुळे शेतकरी चिंतातुर दिसून आले. जणू काही जिल्ह्यात निसर्गच कोपला अस चित्र पहायला मिळत होते. जिल्ह्यात वादळी पाऊस सुरु झाल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे जिल्हा अंधारात होता. ठिकठिकाणी गारपीट झाल्याने हवेत प्रचंड गारवा वाढला आहे. त्यामुळे आता मानवी आरोग्यावर याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.


शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...


मागील तीन-चार वर्षांपासून सतत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अशात आता यंदाही अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याचा मोठा फटका बळीराजाला बसतांना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गहू काढणीला आले असतानाच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहेत. तर, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 


जालन्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू...


जालना जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा देखील पाहायला मिळाला. दरम्यान, जिल्ह्यात दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी सहा वाजेपासून मेघगर्जनेसह गारपीट आणि रात्री उशिरापर्यंत पाऊस पडतांना पाहायला मिळाला. ज्यात, अर्चना उर्फ पल्लवी विशाल दाभाडे (वय 21 वर्ष, कुंभारी तालुका भोकरदन) आणि शिवाजी कड (वय 38, सिपोरा ता.भोकरदन) यांच्यावर वीज कोसळून  ठार झाले आहेत.


वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला


बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा अनेकांना फटका बसला आहे. संग्रामपूर तालुक्यात वणखेड गावात भागवत कथा सुरू असताना आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. सुदैवाने जीवित हानी नाही, मात्र अनेक वृद्ध भाविक मंडपा खाली दबल्या गेले होते. प्रसंगावधान राखत गावातील तरुणांनी भाविकांची केली सुखरूप सुटका केली आहे. 


तुपकरांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन 


शेतकरी नेते रविकांत  तात्काल जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व जिल्ह्यातील परिस्थिती विषयी चर्चा केली. तसेच तातडीने उद्यापासून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याची विनंती तुपकर यांनी प्रशासनाला केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Unseasonal Rain : पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस