Buldhana News बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध आंदोलनाच्या 23 गुन्ह्यात न्यायालयाने मंजूर केलेला जमीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी (Buldhana Police) न्यायालयात धाव घेतली आहे. जामीन त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा पोलिसांची जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शेतकऱ्यांसाठी झालेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तुपकरांना पोलिसांनी 'सराईत गुन्हेगार' असे म्हटले आहे. रविकांत तुपकरांच्या जामीन रद्दच्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 


निकालापूर्वी निर्धार मेळाव्याचे आयोजन


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांचा मागील विविध आंदोलनाच्या 23 गुन्ह्यात न्यायालयाने मंजूर केलेला जमीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आज 15 फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत यावर न्यायालयाच्या वतीने निर्णय येणे अपेक्षित आहे. या निकालाच्या पूर्वीच रविकांत तुपकर यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी बुलढाणा येथील गर्दै वाचनालय सभागृहात निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे.


आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण निकाल विरोधात गेला तर रविकांत तुपकर यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकते. रविकांत तुपकर यांना जर तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी आपल्याला लढाई त्याच ताकदीने लढायची आहे. आपला निर्धार पक्का आहे. काहीही झाले तरी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायचीचं आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी बुथ प्रमुखांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. 


न्यायालयात दाखल पत्रात 'सराईत गुन्हेगार' असा उल्लेख 


रविकांत तुपकर हे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर, प्रश्नांवर त्यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. यापैकी काही आंदोलनात तुपकरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी तुपकरांना 23 प्रकरणांमध्ये कोर्टाने जामीन दिला आहे. आता, पोलिसांनी हे जामीन रद्द करण्याची मागणी जिल्हा कोर्टाकडे केली आहे. रविकांत तुपकरांचा पोलिसांकडून न्यायालयात दाखल केलेल्या पत्रात 'सराईत गुन्हेगार' असा उल्लेख करण्यात आला आहे.


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला म्हणून मला अडचणीत आणण्याचे काम सरकार करत आहे. मला कशाही पद्धतीने तुरुंगात टाकायची प्लानिंग सरकार करत असल्याचे आरोप तुपकर यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. मला तडीपार करायचं प्लानिंग सुरू आहे. माझ्यावर झोपडपट्टी दादा अ‍ॅक्ट लावायची तयारी सुरु आहे. कोणत्याही प्रकारे रविकांत तुपकर हा निवडणुकीच्या मैदानातून बाहेर गेला पाहिजे, त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न होत आहे. माझ्यावर, माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल केल्या जात आहे, असा आरोप देखील रविकांत तुपकरांनी केला होता. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या