Buldhana News: बुलढाणा: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला म्हणून मला अडचणीत आणण्याचे काम सरकार करत आहे. मला कशाही पद्धतीने तुरुंगात टाकायची प्लानिंग सरकार करत आहे. जेणेकरून मी आगामी लोकसभा निवडणुकांपासून बाजूला राहील, यासाठी 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याची मागणी सरकारने कोर्टात केली आहे.


शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) आणि मेहकरचे आमदार संजय रायमूलकर (Sanjay Raimulkar) यांनी मिळून माझ्यावर अर्धा-अर्धा तास भाषणे केली. त्यावेळी त्यांनी भर सभेत सांगितले की, आम्ही रविकांत तुपकरला मारणार आहोत. त्यांना देखील मी सांगतो, मी शेतकरी पुत्र आहे, मी काय लेचापेचा नाही. भाडोत्री गुंड काय पाठवता. हिंमत असेल तर आमदार, खासदारांनी माझ्यासोबत दोन हात करावे, असे खुले आव्हान शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) केले आहे. 


मला तडीपार करायचं प्लानिंग


मला तडीपार करायचं प्लानिंग सुरू आहे. माझ्यावर झोपडपट्टी दादा अ‍ॅक्ट लावायची तयारी सुरु आहे. कोणत्याही प्रकारे रविकांत तुपकर हा निवडणुकीच्या मैदानातून बाहेर गेला पाहिजे, त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न होत आहे. माझ्यावर, माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल केल्या जात आहे, असा आरोप देखील रविकांत तुपकरांनी केला आहे. 


आज गावागावात शेतकऱ्यांकडून पाठिंबा मिळतो आहे. लोक निवडणुकीसाठी वर्गणी गोळा करत आहेत. पक्ष बाजूला ठेऊन या शेतकऱ्याच्या पोराला संधी देऊ, अशी भावना लोकांच्या मनात तयार झाली आहे. त्यामुळेच आज यांच्या पायाखालची जमीन सरकली असून ते असे प्रयोग करत आहेत. मात्र त्यांना हे ठाऊक नाही, हा रविकांत तुपकर एकटा नाही, त्याच्या पाठीमागे तमाम शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. असे देखील तुपकर म्हणाले.


मी तुरुंगातून लढेल पण थांबणार नाही


आंदोलनात आमची पीएचडी झाली आहे. सरकारला कसे कोंडीत पकडायचे हे आम्हाला ठाऊक आहे. मागे सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी आम्ही सरकारला इशारा देत रेल्वे रोको आंदोलन पुकारले. मात्र त्यापूर्वीच मला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर माझ्या बायकोने त्याठिकाणी आंदोलन केले. त्यावेळी माझ्या बायकोवर देखील खोट्या केसेस दाखल केल्या. मला रात्री अटक केली ती बुलढाणा पोलीस स्टेशनला. मात्र गुपचुप नेले मेहकर पोलीस स्टेशनला. त्यावेळी तिथे शेतकऱ्यांचा जमाव जमल्याने परत मला बुलढाणा पोलीस स्टेशनला आणण्यात आले. म्हणजे मी काय दाऊदच्या टोळीत काम करतो का, असा सवाल देखील रविकांत तुपकरांनी विचारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मला तुरुंगात टाका, फासावर चढवा, किंवा वाट्टेल ते करा मी तुरुंगातून लोकसभा लढेल, पण थांबणार नाही, असे देखील शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या