Maharashtra Buldhana News: बुलढाण्यातील (Buldhana) मेहकर (Mehkar) शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही समाजकंटकांनी धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली, तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी, काठी, दगडांनी मारहाण केली. घरात घुसून सामानाची तोडफोड केली. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, आमदार संजय गायकवाड हे 40-50 वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते घेऊन मेहकरात पोहचले. मेहकरच्या ठाणेदाराला झापझाप झापलं. पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांचा जामीन झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.
नेमकं काय घडलं?
मेहकर शहरातील मोळा रोडवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी 43 वर्षीय नेहाताई काटकर यांच्या तक्रारीवरून 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नेहाताई काटकर या आमदार संजय गायकवाड यांच्या भाची आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या गल्लीतील महिलांसह मंदिरात दर्शनासाठी जात असताना 20 ते 25 जणांचं टोळकं हातात लाठ्या काठ्या घेऊन महिलांना आडवं आलं. त्यातील 15 वर्षीय मुलीसमोर फटाका फोडला, अश्लील हावभाव करून मुलीची छेड काढली. सौ. काटकर यांच्या अंगावरील 1 तोळा सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले.
तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?
यावेळी तक्रारदार सौ. काटकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केला, तेव्हा त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र धावत आला. यावेळी टोळक्यानं त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. यावेळी काटकर त्यांच्या घरात गेल्या असता गुंडांनी घरात घुसून सामानाची नासधूस केली, तोडफोड केली, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकरात पोहचले. यावेळी घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. "हा वाद धार्मिक कारणावरून आहे, मंदिरात आरती का लावता? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस का ठेवता?" असल्या कारणांमुळे वाद झाल्याचं आमदार गायकवाड म्हणाले. आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांना जामीन मिळाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही.", असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.