बुलढाणा : एकीकडे राज्य सरकारकडून झाडे लावा, झाडे जगवा असा मंत्र दिला जातो. राज्याचा वन विभाग (forest) वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत झाडे लावण्यासाठी स्थानिक ते राज्य स्तरावरुन मोहीमही राबवत असतो. मात्र, आता सरकारी अधिकाऱ्यांनीच झाडांची कत्तल केल्याची मोठी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे माँ जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा (Sindhkhed raja) येथील जन्मस्थळासमोरील ही झाडे कापल्याने जिजाऊ भक्तांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच जिजाऊ भक्त घटनास्थळी पोहोचले होते, त्यानंतर संबंधित विभागाने वृक्षतोड थांबवली आहे. मात्र, या परिसरातील 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून उभी असलेली झाडे कापल्यामुळे येथील निसर्ग सुंदरता संपुष्टात आल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.  


झाडं तोडणं हा कायद्यानव्ये गुन्हा असून सर्वसामान्य नागरिकांना यासाठी मोठा दंडही आकारला जातो. वन विभागाचे वृक्षतोड किंवा वनसंपदा नुकसानीचे कायदेही कडक आहेत. त्यामुळे, वन विभागातील शासकीय संपदेचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाईही केली जाते. पण, चक्क शासकीय अधिकाऱ्यांकडूनच आता सिंदखेड राजा या जिजाऊ जन्मस्थळाजवळील जुनी झाडे कापण्यात आल्याचे समोर आले आहे. सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेला राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याच्या परिसरातील जवळपास 40 एक झाडे आज पुरातत्व विभागाने कापून टाकली आहेत. स्थानिक प्रशासनाला कुठलीही माहिती न देता ही झाडे कापून टाकल्यामुळे स्थानिक जिजाऊ भक्तामध्ये संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 40 ते 50 वर्षांपासून सुशोभीकरणासाठी ही झाडे लावलेली होती, राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याच्या नैसर्गिक सुंदरतेच्या सुशोभीकरणासाठी ही झाडे महत्त्वाची होती. मात्र, अचानक आज पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी या 60 फूट उंच झाडांची कत्तल केल्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.


जिजाऊ भक्त संतप्त, ओंडक्यावर बसून आंदोलन


राजवाड्यासमोरील जवळपास 35 ते 40 झाडे तोडण्यात आली असून गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर सध्या वृक्षतोड थांबविण्यात आली आहे. या वृक्षतोडी विरोधात गावकरी व जिजाऊ भक्त आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे, या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव राजवाड्याच्या परिसरातील वृक्षतोड केल्याने संतप्त गावकऱ्यांनी पुरातत्त्व विभागाच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी गावकऱ्यांनी तोडलेल्या वृक्षांच्या ओंडक्यावर बसून सुरू केलं ठिय्या आंदोलन केले. 


हेही वाचा


मोठी बातमी! भाजप आमदाराचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांची भेट; हरिभाऊ नानांच्या जागी कोण?