मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा (Resignation) दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे, भाजपची विधानसभा सदस्यांची संख्या एकाने कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत खासदार बनलेल्या 8 आमदारांनी आपल्या आमदारकीचा (MLA) राजीनामा दिला. त्यानंतर, लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. आता, हरिभाऊ बागडे यांनाही मोठी संधी मिळाल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जुलै रोजी देशात अनेक राज्यपालांची नियुक्ती केली. त्यातील काही नेते महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ किसनराव बागडे. हरिभाऊ यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, भाजपने हरिभाऊ बागडेंना मोठी संधी दिली असून थेट राज्यपालपदाची जबाबदारी आता त्यांच्यावर देण्यात आली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या राजीनामामुळे आता, फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून अनुराध चव्हण, राधाकिसन पठाडे, सुहास सिरसाट, विजय औताडे, रामभाऊ शेळके, राजेंद्र साबळे, प्रदीप पाटील आणि दामुअण्णा नवपुते ही नावे इच्छुक आहेत. 


हरिभाऊ बागडे यांनी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलंय. 1985 मध्ये ते पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर, फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून ते 5 वेळा आमदार राहिले आहेत. मतदारसंघात त्यांची ओळख हरिभाऊ नाना म्हणून प्रसिद्ध आहे. हरिभाऊ किसनराव बागडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. 2014 मध्ये, जेव्हा भाजपाने महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. त्यामुळेच, भाजपकडून त्यांना राज्यपालपदी संधी देऊन त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान केला आहे.  


दरम्यान, हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे 45 वे राज्यपाल बनले आहेत. राज्याचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्रा यांचा कार्यकाळ २१ जुलै रोजी पूर्ण झाला. लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार असून आज त्यांनी महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. 


देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हरिभाऊ बागडे यांच्या राज्यपालपदी नियुक्तीबाबत त्यांचे अभिनंदन केले. तसेच, आज विधिमंडळ सचिवालयाच्या वतीने देखील त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे, यावेळी प्रधान सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते. 


हेही वाचा


Video : ''ते नसतानाही पुण्यात धरण वाहिलंय''; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, पूरस्थितीवरुन निशाणा