बुलढाणा : जिथं देशभर शहर, गावांच्या नामांतराचा मुद्दा जोर धरत आहे. तिथं बुलढाण्यातील एका छोट्याशा गावाच्या नामांतरासाठी गावकाऱ्यांनी दिलेल्या एकजूट लढ्याला तब्बल 40 वर्षानंतर यश मिळालं आहे. या गावाचा नामांतर ही एक चांगल्या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर झालं आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार लोकसंख्या असलेलं 'उंद्री' हे गाव आहे. जालना - खामगाव मार्गावरील हे गाव तसं सर्वधर्मीय वस्ती असलेलं....पिढ्यानपिढ्या गुण्या गोविंदाने राहणार गाव आहे. पण गावाच्या नावामुळे या गावातील अनेकांना सांगण्यास संकोच वाटत होता. तशी उंद्री ही ग्रामीण भागातील शिवी असल्याचा भाव या गावकाऱ्यांमध्ये होता. म्हणून 1981 साली गावातील तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांना एक निनावी पत्र पाठवून आमच्या गावाचं नाव बदलून द्या अशी मागणी केली. विशेष म्हणजे त्या पत्राची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेऊन तात्काळ गावाच्या सरपंचांना पत्र लिहून तसा ठराव मागण्यात आला.


गावाला एक पार्श्वभूमी होती ती म्हणजे 1931 साली देशात सर्वत्र दलित - सवर्ण असा वाद सुरू असताना उंद्री या गावात गावकऱ्यांनी दलित आणि सवर्ण यांच्यात एकोपा घडवून एका विहिरीवर पाणी भरणे , एका कार्यक्रमात जेवण करणे असे उपक्रम सुरू करून दलित सवर्णातील दरी मिटवून एक आदर्श उदय निर्माण केल्याने देशात या गावाचं नाव सगळीकडे चर्चेत येऊ लागलं. एक नवा 'उदय'  या गावाने निर्माण केल्याने गावतील नागरिकांनी आपल्या गावाचं नामकरण उदयनगर व्हावं असा ठराव सरकारकडे पाठविला. पुढे 1989 पासून आजचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी गावाच्या नामकरणाचा पाठपुरावा करून त्याला गेल्या 31 मे रोजी यश मिळालं. आज सरकारने आपल्या गॅझेटमध्ये या गावाचं नामकरण करून ' उदयनगर' असे केलं आहे. 


गेल्या चाळीस वर्षाच्या एका निनावी पत्राने सुरू केलेल्या या नामांतराची कहाणी आज यशस्वीरित्या संपली असल्याने व गावाचं नामांतर झाल्याने गावातील नागरिक आनंदित आहेत. गावातील नागरिकांना आता मी उदयनगर गावचा....! अस सांगण्यात संकोच वाटत नसून गावातील नागरिक अभिमान व्यक्त करत आहेत.