बुलढाणा : फेब्रुवारी 2020 ते मार्च 2022 या काळात जगात कोरोनामुळे प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना बुलढाण्यातील संग्रामपूर या आदिवासी बहुल भागात मात्र महसूल विभागातील अधिकारी एका वेगळाच घोटाळा करण्यात गुंतले होते. कुठलीही वादग्रस्त मालमत्ता नावावर करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील बनावट नोंदणी क्रमांक टाकून नोंदणी करुन देण्याचा महसूल विभागाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. 


नेमका काय आहे घोटाळा आणि तो कसा करण्यात आला?
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर या आदिवासी बहुल तालुक्यातील 12 तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी 77 जणांचे वादातील व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट दस्तावेज क्रमांक टाकून आपल्या दप्तरी नोंद करुन घेतले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाकडे असलेल्या व्यवहाराचे बनावट नोंदणीचे क्रमांक वापरुन या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी असंख्य शेतकऱ्यांना फसवून बनावट फेरफारच्या नोंदी घेतल्या आहे. फेरफार नोंदीवरील दुय्यम निबंधक कार्यालयाचा क्रमांक बनावट असल्याने भविष्यात या सर्व व्यवहारात शेतकऱ्यांना अडचणी जाणार आहेत. खोटे आणि बनावट दस्त नोंदणी क्रमांक वापरुन शेतकऱ्यांचे वादातील व्यवहार फेरफार करुन नियमित करणे हा फार मोठा घोटाळा असल्याने आता नागरिक हक्क बचाव आंदोलन समितीने हे सर्व फेरफार रद्द करावेत. या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन दुसऱ्या जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी प्रल्हाद दातार, राज्य अध्यक्ष, नागरिक हक्क बचाव समिती यांनी केली आहे.


एबीपी माझाने पाठपुरावा करत केली पडताळणी
संग्रामपूर या आदिवासी बहुल तालुक्यातील बनावट क्रमांक वापरुन घेण्यात आलेल्या 77 फेरफार खात्यांची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली. ती दुय्यम निबंधकांकडे तपासणीसाठी नेली असता यातील एकही फेरफारमधील वापरण्यात आलेला क्रमांक हा दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तावेजाशी जुळून आला नाही. बनावट क्रमांक वापरुन ज्या क्रमांकावर हक्कसोड नोंद आहे त्या क्रमांकावर दुय्यम निबंधकांकडे शेतीची खरेदी तर जो बनावट क्रमांक वापरुन वाटणीपत्र नोंदविल गेले त्याठिकाणी बक्षीस पत्राची नोंद दुय्यम निबंधकांकडे आहे. याबाबत एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी शहानिशा करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय गाठलं. त्यावेळी येथील वरिष्ठ दुय्यम निबंधक श्री एस.बी. भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार 77 बनावट क्रमांकाची पडताडणी केली असता एकही क्रमांक मूळ दस्तावेजाशी जुळला नाही. त्यातील उदाहरणादाखल खालील नोंदी देत आहोत.


Case Study 1 - संग्रामपूर येथील फेरफार क्रमांक 5136 हा दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदच नाही तरीही फेरफार क्र 5136 मध्ये दुय्यम निबंधकांकडे 169 क्रमांकाची बनावट नोंदणी करुन याचा फेरफार घेण्यात आला. मात्र आम्ही प्रत्यक्ष दुय्यम निबंधकांकडे 169 या क्रमांकाची चौकशी केली असता त्या क्रमांकावर शेतीची खरेदी असल्याची नोंद आहे. म्हणजे बनावट नोंदणी क्रमांक वापरुन तलाठी एस बी भिसे आणि मंडळ अधिकारी भिल यांनी बनावट फेरफार घेतला आहे.




Case Study 2 - संग्रामपूर तालुक्यातील बोडखा या गावातील फेरफार क्रमांक 1131 याची तलाठी कार्यालयात वाटणीपत्र म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयातील बनावट क्र.1224 हा वापरुन नोंद घेण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात दुय्यम निबंधकांकडे 1214 या क्रमांकावर बक्षीसपत्र आहे. यातही बनावट नोंदणी क्र 1224 हा वापरण्यात आला आहे.





घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने महसूल विभागात खळबळ
या घोट्याळ्याची व्याप्ती मोठी असल्याने भविष्यात या सर्व बनावट नोंदणी व्यवहाराची शेतकऱ्यांनाच मोठी अडचण होणार आहे. शिवाय बनावट नोंदणी करुन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झालेली असताना मात्र वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी यावर बोलण्यास नकार देत आहेत. तर एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर संग्रामपूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी हे सर्व 77 फेरफार रद्द करण्याची शिफारस करणार असल्याचं सांगितलं.  


शेतकऱ्यांच्या फसवणुकीची वरिष्ठ दखल घेतील?
कोरोना काळात प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याची धडपड करत असताना मात्र या घोटाळेबाज तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी एक मोठा फेरफार घोटाळा करुन ठेवला आहे. अर्थात यात कोट्यवधींचे वादग्रस्त व्यवहार हे बनावट नोंदणी क्रमांक वापरुन नियमित करण्यात आल्याने आता वरिष्ठ अधिकारीही सावरासावर करताना दिसून येत आहे. राज्याचे महसूल मंत्री याची नक्कीच दखल घेतील अशी अपेक्षा केली जात आहे.