Maharashtra Buldhana Politics : शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटात सुरु असलेल्या संघर्षात नेते रोजच वेगवेगळी वक्तव्यं करतायत. त्यात बुलढाण्याचे (Buldana News) खासदार प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) निशाणा साधताना केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या वाळूच्या गाड्या पकडल्या आणि पत्त्यांच्या क्लबवर धाड पडली तर, वाईट काम असलं तरी आम्हालाच फोन करावा लागतो, असं वक्तव्य प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे कधी पोलीस ठाण्याची पायरी चढले आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. एवढंच नाहीतर सचिन वाझे दर महिन्याला 'मातोश्री'वर 100 खोके पाठवायचा, असा गंभीर आरोपही त्यांनी ठाकरेंवर केला आहे. 


शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव बोलताना म्हणाले की, "50 खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असत." शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरेंवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षात दोन गट झाले. एक ठाकरे समर्थक आणि दुसरे शिंदे समर्थक. अशातच दोन्ही गटांमध्ये दररोज वेगवेगळ्या कारणांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडत असतात. अशातच ठाकरे समर्थकांच्या '50 खोके एकदम ओके' या घोषणेला प्रत्युत्तर देत प्रतापरावांनी 'शंभर खोके एकदम ओके' असं म्हणत ठाकरेंना जणू आव्हानच दिलं आहे. 


शिवसेनेतील बंडानंतर राज्यात ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. पण अनेक दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे सरकारवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि काही दिवसांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या पार पडल्यानंतर गुलाबराव पाटील बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते. त्यावेळी रॅली काढून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात बोलताना खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंवर आगपाखड केली आहे. 


दरम्यान, शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. आधीच दसरा मेळाव्यावरुन ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये जुपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता प्रतापराव जाधवांच्या आरोपांनंतर पुन्हा शिवसेना आणि शिंदे गटात नव्या वादाला सुरुवात होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.