बुलढाणा : राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस (ST Bus) चोरीला गेल्याची घटना रविवारी रात्री बुलढाण्यातील (Buldhana News) देऊळगाव राजा बस स्थानकात घडली.विश्रांती कक्षात झोपलेले चालक आणि वाहक झोपलेले असताना बस चोरीला गेली. बस स्थानक परिसरातून बस चोरीला गेल्याने प्रशासनाची झोप उडाली. एसटी बस चोरीला गेल्याची तक्रार देऊळगाव पोलिस स्थानकात (Deulgaon Raja Police Station) करणयात आली आहे.
रविवारी बस (एमएच 07 C 9273) रात्री देऊळगाव राजा बसस्थानकात मुक्कामासाठी थांबली होती. बसचालक आणि वाहक हे बसस्थानकातील विश्रांती कक्षात झोपले होते. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ही बस चालू करून पळवून नेली. देऊळगाव राजा बस स्थानकात मुक्कामी असलेली मानव विकास मिशनची बस अज्ञाताने बस स्टँड आवारातून गायब केली. पहाटे स्थानकात बस नसल्याचे लक्षात आले त्यानंतर बसची शोधाशोध सुरू झाली. या संदर्भात तक्रार एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात तक्रार दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बस चोरीच्या घटनेने देऊळगाव राजा स्थानकातील अधिकारीही हैराण झाले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर बस आढळली. बस सापडल्याने चालक आणि वाहकाचा जीव भांड्यात पडला. सदर बस अज्ञाताने सुरू करून चिखली मार्गाने जाताना बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळल्याने नादुरुस्त अवस्थेत बस रस्त्यात उभी करून पोबारा केला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरण चौकशी सुरू केली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
एसटी कर्मचारी सहभागी असल्याचा संशय
पोलिसांना या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांमधील मतभेद किंवा भांडणातून अस घडलं असल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयंत सातव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे .मात्र या प्रकरणाची चर्चा दिवसभर परिसरात सुरू होती