Maharashtra Politics: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाला (Congress) मोठा धक्का बसला होता. अशोक चव्हाण पाठोपाठ अनेक काँग्रेस नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा देखील करण्यात आला होता. असे असतांनाच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढण्यात (Buldhana News) काँग्रेस पक्षाला पुन्हा एक खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण बुलढाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर तब्बल तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप सानंदा (Dilip Sananda) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतांना दिसत आहे.


दिलीप सानंदा अमित शाहांच्या भेटीला 


दिलीप सानंदा हे गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती देखील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने दिली आहे. सध्या गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दिलीप सानंदा हे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी मुंबईत असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. त्यामुळे माजी आमदार दिलीप सानंदा हे नेमकी काय भूमिका घेतात, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे देखील बोलले जात आहे. दिलीप सानंदा यांनी 1999 साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते सलग 2009 पर्यंत तीन पंचवार्षिक काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. मात्र 2014 साली भाजपचे आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला आणि 2019 साली त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.


बुलढण्यात भाजपची ताकद वाढणार? 


राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा ही बुलढाणा जिल्ह्यातून गेली असता, त्या वेळेला दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात निष्क्रिय झालेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोबतच याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी या चर्चाना दुजोरा दिला असल्याने जवळ जवळ सानंदा यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून या निर्णयाची अधिकृत घोषणा नेमकी कधी होते हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha 2024 : भाजपचं 'नो रिस्क' धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर विशेष लक्ष