बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana) गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. खामगावकरांचे आराध्यदैवत असलेला मानाचा लाकडी गणपती हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अंदाजे 150 वर्षापूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजेच आचारी लोकांनी येथील सराफा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली आहे. संपूर्ण लाकडाने बनविलेली सहा फूट उंचीची या मंदिरातील सुंदर गणेशमूर्ती भाविकांच्या खास आकर्षणाचे केंद्र आहे.
सुरुवातीला लाकडी गणपतीचे (Lakadi Ganpati) साधे मंदिर होते. 1997 साली सध्याच्या व्यवस्थापक मंडळाने या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिराची उभारणी केली आहे. खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाचे मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असते. मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही अशी येथील परंपरा आहे. लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचे विसर्जन होत नाही तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केले जाते व मिरवणुकीनंतर मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवली जाते.
गणेशोत्सवाच्या दहा दिवस तसेच दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविकांची लाकडी गणपती मंदिरात जिल्हाभरातून मोठी गर्दी होते. भाविक सत्यनारायणाची पूजा घालून देवाला साकडे घालतात. पुणे, मुंबईपासून भाविक लाकडी गणपतीच्या दर्शनाला येतात. खामगावकरांचे आराध्यदैवत असल्याने लाकडी गणपतीशी भाविकांच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत.
गेल्या दीडशे वर्षांपासूनची ही परंपरा जोपासल्या जात आहे. अय्याजी लोक या ठिकाणी राहायचे आणि त्यांनी या भरीव अशा लाकडी मूर्तीची दीडशे वर्षांपूर्वी या ठिकाणी स्थापना केली आहे. तेव्हापासूनच या ठिकाणी हे गणेश मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये या लाकडी गणपती बाप्पाचा सहभाग झाल्याशिवाय इतर कुठलेही गणेश मंडळ त्या विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan 2022) सहभागी होत नाही. विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकावर या मानाच्या लाकडी गणपतीला स्थान दिलं जातं. म्हणून गणेशोत्सवात दिवस या मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Nashik Dashbhuja Ganesh : नाशिकच्या शिवकालीन दशभुजा गणपतीचा दोन वेळा जीर्णोद्धार, अशी आहे आख्यायिका!