Buldhana Rain : गेल्या दोन दिवसापासून बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अशातच काल रात्री (25 जानेवारी) अवकाळी पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली. यामुळं रब्बी पिकांचं (Rabi Crop) मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कांदा लागवडीचे (Onion Cultivation) दिवस आहेत. त्यामुळं नुकताच लागवड करण्यात आलेल्या कांद्यावर अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळं अनेक रोगांचा हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या भागात पावसाची हजेरी
रात्री जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, संग्रामपूर, जळगाव जामोद , मेहकर या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. या पावसाचा रब्बी पिकांना मोठा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा, हरभरा तसेच गहू या पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. गहू पीक अनेक भागात चांगलं असलं तरी त्यावर वातावरणाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यानं तापमानातही मोठी घट झाली आहे. अनेक भागात धुक्याची दाट चादर आहे.
बदलत्या वातावरणाचा जनावरांवरही परिणाम
बदलत्या वातावरणामुळे जनावरांना देखील आजार होत आहेत. अलीकडेच लम्पी आजाराच्या महामारीतून कुठे सावरत असताना आता बदलत्या वातावरणाचा परिणाम जनावरांवर दिसत आहे. जनावरांना अनेक विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचं बघायला मिळत आहे. यामुळे दूध उत्पादनात मोठे घट होणार असल्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बदलत्या वातावरणामुळे शेतकरी संकटात
सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळं आणि पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. उत्पन्नात मोठी घट होत आहे. यामुळे शेतकरी मात्र वारंवार संकटात सापडत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि रोगराईमुळं अनेक भागात पिके वाया गेली होती. त्यामुळं शेतकऱ्याला आता रब्बी हंगामातील पिकांकडे आशा होती. परंतू, या महिन्यातही वारंवार बदलत असलेलं वातावरण आणि तापमान यामुळं पिकांवर अनेक विषाणूजन्य रोग पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पिकांवर अनेक औषधांची फवारणी करावी लागत आहे. या फवारणीचा मोठा खर्च आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हाती शेवटी पैसे येणार याची शेतकऱ्यांना चिंता आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी पुन्हा पुन्हा अडचणीत सापडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: