Buldhana Agriculture News : सध्या शेतकऱ्यांची कांदा लागववडीची (Onion cultivation) लगबग सुरू आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात जवळपास दीड ते अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर यावर्षी कांदा पिकाची लागवड अपेक्षित असल्याचं बोलल जात आहे. सकाळीच महिला मजूर वर्ग कांदा लागवडीसाठी शेतात जातात आणि कांदा लागवड करतात. यावर्षी खरिपात झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांना कांदा पिकाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. 


बुलढाण्यासह राज्यभरात कांदा लागवड वाढण्याची शक्यता 


गेल्या खरीप हंगामात कुठे अतिवृष्टी तर कुठे रोगाराईमुळं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळं यावर्षी बुलढाण्यासह राज्यभरात कांदा लागवड वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरिपात झालेली नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीनं शेतकरी आता कांदा लागवडीच्या लगबगीत आहे.


कांद्याची लागवड करताना महिला म्हणतायेत गाणी 


कांद्याची लागवड शक्यतो महिला वर्गाकडून केली जाते. सकाळीच महिलावर्ग शेतात जाऊन कांद्याची लागवड करतात. अनेक महिला एकत्र येऊन आपल्या पारंपरिक गाण्याच्या माध्यमातून  'माझ्या शेतकरी राजाला यंदा कांद्याचं चांगलं उत्पन्न होऊ दे...! काहीशा अशा आशयाची गाणी या महिला कांदा लागवड करताना म्हणत आहेत. 


नाशिक जिल्ह्यात कांद्याचं मोठं उत्पादन 


महाराष्ट्रात प्रतिवर्षी खरीप आणि लेट खरीप हंगामात चार-साडेचार लाख हेक्टरवर कांदा लागवड करण्यात येते. पण यावर्षी अतिवृष्टीमुळे लागवडीखालील क्षेत्रात तब्बल अडीच लाख हेक्टरची घट झाली आहे. रब्बीतील कांदा लागवडीची तयारी आता सुरु झाली आहे. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. राज्यातील एकूण कांदा उत्पादनातील 70 टक्के उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यात होते. नाशिक पाठोपाठ अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. पण जुलै ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये सततचा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांद्याची रोपे वाया गेली आणि जमिनीतील ओलावाही कमी झाला नाही. 


15 नोव्हेंबरनंतर सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात कांद्याची लागवड वाढेल, असा अंदाज फलोत्पादन विभागाकडून वर्तविण्यात आला होता. मागील वर्षी जवळपास दोन ते अडीच लाख टनपर्यंत कांदा शिल्लक असेल आणि बराच कांदा पावसामुळं खराब झाला आहे. त्यामुळं पुढील दोन महिने कांद्याचे दर वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सध्या कांद्याला दीड हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Onion Crop : नाशिक जिल्ह्यात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांची चिंता वाढली