Buldhana News : कोरोना महामारीत (Covid-19 Pandemic) कोरोनाची लागण होऊन मरण पावलेल्या वडिलांचा सिलिकॉनपासून (Silicon) बनवलेला हुबेहुब पुतळा थोरल्या भावाने धाकट्या भावाला त्याच्या वाढदिवसालाच (Birthday) भेट दिला. भावाने दिलेली ही हदयस्पर्शी भेट सध्या बुलढाण्यातील चिखलीत (Chikhli) चर्चेचा विषय ठरत आहे. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे धाकट्या भावावर विरहातून मानसिक आघात झाला होता. या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्याकरता कुटुंबियांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्याच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत वडिलांचा हुबेहुब दिसणारा सिलिकॉनचा पुतळा पाहून धाकट्या भावाने अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.


कोरोना वडील गेल्याने धाकट्या भावावर मानसिक आघात


बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली इथले दीपक विष्णू विनकर हे ग्रामीण भागातील एका शाळेत शिक्षक होते. करोना महामारीच्या लाटेत 21 जून 2023 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि भाऊ असा परिवार आहे. थोरला मुलगा शुभम (वय 18 वर्ष) हा डीटीएडचं शिक्षण घेत आहे. तर धाकटा भाऊ सुमिध (वय 14 वर्ष) आठवीच्या वर्गात शिकत आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे सुमिधला मोठा मानसिक धक्का बसला होता. सुमिध हा वडिलांच्या निधनाचा आघात सहन करु शकला नाही. यातच त्याची मानसिक अवस्था खालावली. चिडचिडपणा करुन तो एकटाच बसत होता.त्याचं शांत बसणं कुटुंबियांसाठी त्रासदायक ठरत होतं त्याच्या बदलेल्या वागण्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते.  


मानसिक स्वास्थ्य खालावलेल्या धाकट्या भावासाठी मोठ्या भावाची अनोखी शक्कल


सुमिधला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी थोरला भाऊ शुभम, आई आणि मामा यांनी अथक प्रयत्न केले. अखेरीस कुटुंबियांच्या चर्चेतून सुमिधला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगळीवेगळी वस्तू भेट म्हणून देण्याचं ठरलं. सुमिधच्या वाढदिवसाला वडिलांचा सिलिकॉनचा पुतळा भेट देऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या भावाने वडिलांचा हुबेहुब पुतळ बनवून आपल्यासाठी केलेली ही धडपड पाहून सुमिधला अश्रू अनावर झाले. त्यांच्या या बंधुप्रेमाची चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे.


पत्नीच्या पुतळ्यासह गृहप्रवेश


याआधी कर्नाटकमधील उद्योजकानेही आपल्या दिवंगत पत्नीचा सिलिकॉनचा पुतळा बनवला आणि त्यासोबतच गृहप्रवेश केला होता. श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नी माधवी यांचा तिरुपती यात्रेदरम्यान अपघात झाला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या दोन्ही मुलींनाही दुखापत झाली होती, सुदैवाने त्यांची प्रकृती सुधारली. मात्र आपल्या नव्या घरात पत्नी असावी यासाठी श्रीनिवास गुप्ता यांनी माधवी यांचा सिलिकॉनचा पुतळा बनवला आणि त्यासोबतच गृहप्रवेश केला. सोफ्यावर माधवी यांना बसलेलं पाहून गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात सामील झालेल्या पाहुण्यांना धक्का बसला. परंतु माधवी यांचा पुतळा असल्याचं समजल्यानंतर तेही पुतळ्याकडे पाहतच राहिले.


हेही पाहा