बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सणाच्या दिवशीच राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन पानांची सुसाईड नोट लिहून या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना खडकपुर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मृतदेहाजवळ तीन पानांची सुसाईड नोट
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील प्रगतशील व राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज सकाळी आपल्या शेतात विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी तीन पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. या शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ तीन पानांची सुसाईड नोट मिळाल्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कन्फर्म केलं आहे. कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांने अनेक दिवसापासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता. गेला डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलनही केलं होतं.
मात्र, परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी असल्याने जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना घेऊन जाऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे. सध्या पोलीस या ठिकाणी पोहचले आहे. कैलास नागरे यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे, या ठिकाणी हजारो शेतकरी या ठिकाणी जमले आहेत.