Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापुरामध्ये एका मोठ्या काँग्रेस (Congress) नेत्याकडून आपल्या रुग्णालयात आणि आपल्या घरात वीज चोरी (Electricity Theft) करण्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. अरविंद कोलते असं या काँग्रेस नेत्याचं नाव आहे. विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन तब्बल सव्वा दोन वर्ष वीज चोरी सुरु होती. या प्रकरणी बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून 10 लाख 47 हजार 922 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


सव्वा दोन वर्षात तब्बल 60 हजार 978 युनिटची चोरी


डॉ. अरविंद कोलते यांच्या रुग्णालयात आणि घरात वीज चोरी होत असल्याची माहिती विद्युत वितरणला मिळाली. त्यानुसार बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात असलेल्या विद्युत मीटरची तपासणी केली असता विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे समोर आलं आहे. यावेळी मीटरची तपासणी करुन गेल्या सव्वा दोन वर्षांपासून ही वीज चोरी सुरु असल्याचं उघड झालं. या सव्वा दोन वर्षात तब्बल 60 हजार 978 युनिटची चोरी केल्याचं भरारी पथकाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून या काँग्रेसच्या नेत्याला 10 लाख 47 हजार 922 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाई दरम्यान भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात लावलेले विद्युत मीटर जप्त केले आहे. विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मलकापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


डॉ. कोलतेंनी तीन वेळा मलकापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली


विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन वीज चोरी करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे डॉ. अरविंद कोलते असे नाव आहे. डॉ. कोलते यांनी तीन टर्म मलकापूर विधानसभेमध्ये निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. एकदा अपक्ष तर दोनदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर डॉ. कोलतेंनी निवडणूक लढवलेली आहे. शिवाय निवडणूक लागण्याच्या आधी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डॉ. अरविंद कोलते हे मुख्य प्रशासक म्हणून कारभार पाहत होते. यामुळेच काँग्रेस नेते डॉ. अरविंद कोलते यांनी वीज चोरी केल्याने ते चर्चेत आले आहेत.


वीज चोरी केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद


वीज चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. वीज चोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करु नये तसेच अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येतं. वीज चोरी पकडली गेल्यास वीज बिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो. हे पर्याय न स्वीकारल्यास अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होतो. तसंच मीटर जप्त करुन कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे भरारी पथक सदैव तयार असतात. एखाद्या ठिकाणी वीज चोरी होत असल्याची शंका आल्यास हे पथक छापे टाकतात. यासंदर्भात पथकाला अनेक नागरिकांकडून गुप्त माहिती मिळत असते. ही भरारी पथकं व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून मीटरची तपासणी करु शकतात.