Sanjay Gaikwad : कोण कुठला नेता काय म्हणतो त्याला काही महत्व नाही. आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य शिवसेना आमदार (शिंदे गट) संजय गायकवाड यांनी केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप 240 तर शिंदे गट 48 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय गायकवाड प्रत्युत्तर दिलं आहे.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा शिंदे गट नसून शिवसेना आहे. आमची बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आहे. ही शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे कोण कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्याला काही महत्त्व नसल्याचे संजय गायकवाड म्हणाले. आमची युती ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वांसोबतचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही 125 ते 130 जागा लढवणार आहोत असे गायकवाड म्हणाले. भाजप आमच्यापेक्षा मोठा पक्ष असल्यामुळे निश्चितच आमच्यापेक्षा थोड्याफार जागा ते जास्त लढतील. पण आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 च्या खाली जागा लढणार नसल्याचे संजय गायकवाड म्हणाले.


चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?


भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत मोठे वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युल्याबाबत जागावाटप सांगितलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी भाजप 240 जागा लढवणार तर 48 जागा शिवसेनेला देणार असल्याचे सांगितलं. त्यानंतर बावनकुळेंच्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला आहे. 


वाद निर्माण झाल्यानंतर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण 


दरम्यान, जागावाटपाच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर बावनकुळेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, "त्या व्हिडिओमधील अर्धाच भाग दाखवण्यात आला. शिवसेना आणि भाजप 288 जागा युतीत लढणार आहे. आमचे एनडीए घटक पक्षही असतील. राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही 200 जागा आम्ही जिंकणार आहोत. पूर्वी युतीला मिळाल्या नाही, तेवढं मोठं बहुमत आम्हाला मिळेल.


तोपर्यंत शिंदे गट टिकणार नाही


दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही टोला लगावला आहे. मित्र असो किंवा शत्रू त्यांना फोडणे, नामोहरम करणे आणि त्यांच्याकडे जाणारी मतं आपल्या बाजूला वळवून घेणे असा कार्यक्रम भाजपचा सुरु असल्याचे पाटील म्हणाले. मला खात्री आहे की शिंदेंना ऐनवेळी सांगितलं जाईल की त्यांच्या चार ते पाच ठिकाणी जागा निवडून येऊ शकतात. कारण भाजप सातत्याने सर्वे करत आहे. उरलेल्या सर्व जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करेल असेही पाटील म्हणाले. विधानसभेच्या 288 जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, कारण तोपर्यंत शिंदे गट टिकेल असं मला वाटत नसल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chandrakant Bawankule : बावळकुळेंनी युतीच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला सांगितला, पण सुधीर मुनगंटीवारांकडून सारवासारव! दादा भुसेही बोलले