बुलढाणा : पोळ्याच्या दिवशी खामगाव शहरात दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (29 ऑगस्ट) खामगाव बंदची हाक दिली आहे. भाजपा आमदार आकाश फुंडकर आणि शहरातील सर्व गणेश मंडळांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बंदच आवाहन केले आहे.  बैलपोळ्या दिवशीच्या पोलिसांच्या भूमिकेविरोधात हा बंद पुकारण्या आलाय. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर 300पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत.


पोळ्याच्या दिवशी खामगाव शहरात पोळा उत्सवाला गालबोट लागलं. काही तरुणांच्या कृतीमुळे शहराच्या बोरिपुरा भागात दगडफेक झाली आणि काही काळात पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण ही मिळवलं. पण त्यानंतर पोलिसांनी आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्रकरणाचा तपास करून जवळपास 76 जणांवर गुन्हे दाखल केले तर काहींना अटक देखील केली आहे. अजूनही या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी करीत आहेत तर यातील अनेक आरोपी अद्याप फरार आहे.


भाजपा आमदार आकाश फुंडकर यांची अचानक पत्रकार परिषद आणि बंदच आवाहन


दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेने शहर सावरत असताना सायंकाळी खामगावचे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी अचानक पत्रकार परिषद घेत सोमवारी शहराची अस्मिता टिकविण्यासाठी खामगाव बंद ठेवण्याचं नागरिकांना आवाहन केलं. या पत्रकार परिषदेत बंदच्या कारणांची कारण मीमांसा करताना फुंडकर यांनी पोलीस प्रशासनाचा आणि खामगावातील तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करत त्यांच्या बद्दलच्या तक्रारींचा पाढाच वाचला. पोलीस प्रशासनातील अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त , पोलीस उपअधीक्षक अमोल कोळी व शिवाजीनगर पोलिसांचे निरीक्षक अरुण परदेशी यांना शहरातील गणेशोत्सव होऊच द्यायचा नाही असा आरोप केला.  या तिन्ही अधिकाऱ्यांची जोपर्यंत बदली होत नाही शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही साजरा करणार नसल्याची भूमिका आकाश फुंडकर यांनी घेतली आहे. तसेच  अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. 


खामगाव बंदची घोषणा


सायंकाळी आकाश फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी खामगाव बंद ठेवण्याचं आवाहन करताच शहरातील काही भागातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद करण्यास सुरुवात देखील केली होती. त्यामुळे आता सोमवारचा खामगाव बंद शांततेत व्हावा म्हणून पोलीस प्रशासनासमोर आता आव्हान उभ राहिल आहे.  शहरात खबरदारीचे उपाय लागू करण्यात आले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.


आमदार फुंडकरांची मागणी


आमदार आकाश फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे की, पोलिसांनी दडपशाही करत शहरातील निष्पाप तरुणांना या प्रकरणात गोवले आहे. तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील जवळपास तीनशेच्यावर गणेशमंडळच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिस दिल्या आहेत.  पोलिसांनी गणेशोत्सव भीतीमुक्त वातावरणात होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांवर दडपशाही राखण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप फुंडकरांनी केलाय. तर गणेशोत्सव काळात शहरातील दडपशाही करणाऱ्या या तीन अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी शहराबाहेर पाठविण्याची मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे