Buldhana Swine Flu : बुलढाणा शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यात एकट्या बुलढाणा शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले तर एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू देखील झाला आहे. यामुळे आरोग्य प्रशासन आता अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातील अस्वच्छतेमुळे शहरातील जवळपास 50 डुकरांचा एकाच आठवड्यात मृत्यू झाल्याने शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र विषाणूजन्य तापाची साथ सुरु असून त्यात आता स्वाईन फ्लूने भर घातल्याने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर दिसून येत आहे. आगामी सणासुदीच्या दिवसात स्वाईन फ्लूने आपले पाय पसरु नये म्हणून जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. तर बुलढाणा शहरातील मोकाट डुकरांमुळे शहराचं आरोग्य धोक्यात आल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.


मागील आठवड्यात येथील इकबाल चौकातील एक युवक स्वाईन फ्लूचा बळी ठरला आहे. नंतर एक 28 वर्षीय तरुणी स्वाईन फ्लूने ग्रस्त असल्याचं समोर आलं होतं. तर बुधवारी (24 ऑगस्ट) सरस्वतीनगर मधील 60 वर्षीय वृद्धाला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या वृद्धाला आठ दिवसांपूर्वी ताप आणि खोकला होता. त्याला शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्यांनी वृद्धाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला. बुधवारी सकाळी त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आणि रुग्णाला स्वाईन फ्लू असल्याचं निष्पन्न झालं. रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


बुलढाण्यात 15 दिवसात 50 डुकरांचा मृत्यू, मुख्याधिकाऱ्यांकडून डुक्कर मालकांना इशारा
बुलढाणा शहरात स्वाईन फ्लूचा धोका निर्माण झाला असून या आजाराला जोडूनच एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे. बुलढाणा शहरातील सर्कुलर रोड वरील प्रभाग क्र 13 व 14 मध्ये पंधरा दिवसात जवळपास 40 ते 50 डुकरांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू हा आजार डुकरांशी संबंधित असल्याने भाजपचे माजी नगरसेवक अरविंद होंडे यांनी शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान नगरपरिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून मृत पावलेले डुकरांचा विल्हेवाट लावून शहरात पावडर आणि धुराची फवारणी करत आहे. तसंच मोकाट फिरत असलेल्या डुकरांचा त्यांच्या मालकांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा नगरपरिषद प्रशासनाकडून नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिला आहे.