बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दूषित पाण्यामुळे संपूर्ण जिल्हा ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत आला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील चित्र गंभीर आहे. जिल्ह्यातील घाटाखालील काही तालुके हे खारपान पट्ट्यात येतात. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात जिल्ह्यातील भूजलात विषारी पदार्थ असल्याची घोषणा करण्यात आली होती. याकडे आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे घाटाखालील किडनीग्रस्त रुग्णांची संख्या ही अधिक झाली आहे. आता यासह इतरही आजार हळूहळू डोके वर काढत असल्याचे माहिती आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच घाटाखालील शेगाव तालुक्यातील अनेक गावात तीन दिवसात टक्कल अशी घटना समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या विषयाची तपासणी केल्यानंतर एक गंभीर समस्या समोर आली आहे आणि तो म्हणजे या गावातील पाण्यात नायट्रेटचं प्रमाण पाचपटीने म्हणजे 54 मिलिग्राम इतकं वाढलं आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचे टक्कल पडत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच दरम्यान भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली असता यात नायट्रेटसह इतर विषारी घटकांचा समावेश असल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यात सर्वच तालुके "ब्लू बेबी सिंड्रोम "च्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होते व यात नवजात बालकांचा समावेश होतो.
ब्ल्यू बेबी सिंड्रोम नेमका काय आणि कशामुळे होतो?
या आजाराला इन्फंट मेथेमो-ग्लोबीनेमिया असे वैद्यकीय भाषेत म्हटले जात. यामुळे बाळाची त्वचा निरसळ होण्यास सुरुवात होते. बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन हे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आणि विविध पेशींच्या विकासासाठी आवश्यक असतं . मेंदूला रक्तपुरवठा अथवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो.
जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, खामगाव ,देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर व मोताळा या नऊ तालुक्यातील अनेक गावातील पाण्याचे नमुने सर्वेक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आले. या तालुक्यातील 135 पाण्याचे नमुने हे दूषित आढळून आले असून यात नायट्रेट व टीडीएस प्रमाण जास्त आढळले आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दूषित व पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य पाणी आहे त्यामुळे आम्ही जनतेला आवाहनही केलं आहे जिल्ह्यातील अनेक भागाचे सॅम्पल आम्ही वरिष्ठ लॅबोरेटरी नाशिक व अहमदाबाद येथे पाठवले आहे मात्र मानवाच्या शरीरात नायट्रेटचे प्रमाण आढळत नसल्याने सध्या तरी आम्ही अहवालाची प्रतीक्षा करत आहोत मात्र शरीरात नायट्रेटचं प्रमाण आढळल्यास ब्लू बेबी सिंड्रोम होतो हे नक्की.
हे ही वाचा