बुलढाणा : विदर्भ , मराठवाडा आणि खान्देशात साधारणता अनेक शेतकरी सिंचन क्षमतेनुसार पूर्व हंगामी कपाशीची लागवड करत असतात.  मात्र यावर्षी लागवड करण्यात आलेल्या पूर्व हंगामी कपाशीची वाढ खुंटल्याने शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत आणि यामुळे मात्र कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.


  विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात साधारणता दरवर्षी साडेतीन लाख हेक्‍टरवर पूर्व हंगामी कापसाची लागवड करण्यात येते. सिंचन क्षमतेनुसार साधारणतः शेतकरी हा कापूस मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करतात. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र पूर्व हंगामी कापसावर लाल्या सदृश रोगाचा प्रादुर्भाव झाला असून अन्नद्रव्यांची कमतरता व सूत्र कृमीमुळे कपाशीची वाढ खुंटली असण्याची शक्यता आहे. आणि यामुळे मात्र आता कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. एकटा बुलढाणा जिल्ह्यात सात तालुक्यातील 49 गावातील 714 हेक्टर वरील कपाशीची वाढ खुंटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता शेतकरी कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहे.


 पूर्व हंगामी कापसावर अनेक ठिकाणी लाल्या सदृश रोगामुळे तर काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे कपाशीचे वाढ खुंटल्याच समोर आला आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे एक पथक या भागात पाहणी साठी येणार असल्याची ही माहिती मिळाली आहे.


शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव मिळालेच नाही, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात


 तर दुसरीकडे कापसाच्या भावात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आणखी भाव गडगडले तर.. अशीच चिंता शेतकऱ्यांना आहे.  पाऊस जास्त झाला पण मेहनत करुन शेतकऱ्याने कापूस पिकविला. या शेतकऱ्याने जवळपास पंचवीस क्विंटल कापसाचे उत्पदान घेतले. कापसाला भाव योग्य भाव मिळेल या आशेने या शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. मागील वर्षी कापसाला पंधरा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यंदाही कापसाला तितकाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. भावातील चढउतारामुळे शेतकरी कापूस भाव वाढण्याची आशा बाळगून होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता आर्थिक नुकसानाला देखील सामोरं जाव लाोगणार असल्याचं चित्र आहे. आता बाजार बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना कापूस कसा आणि कोणत्या भावात विकायचा याच विलंचनेत असल्याचं चित्र आहे.  कापसाला भाव मिळत नसल्याने याचा परिणाम वस्त्रोद्योगावर देखील होऊ शकतो. गिरण्यांमध्ये देखील कापूस गाठींचा साठा कमीच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कापूस बाजारात अनिश्चितता दिसून येत आहे.